कोल्हापूर : गडहिंग्लज कारखान्याच्या प्रश्नांबाबत संयुक्त बैठक बोलावण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना साकडे

कोल्हापूर: आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्यावर मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलकडेच सत्ता आहे. निवडणुकीनंतरच्या तीनही हंगामात अपेक्षित गाळप न झाल्यामुळे जिल्हा बँकेतून घेतलेले कर्ज २०० कोटींच्या घरात पोहोचले आहे. माजी अध्यक्ष डॉ. प्रकाश शहापूरकर यांच्यावर ३० कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप करणाऱ्यांनीही तोच कित्ता गिरवला. त्यामुळे गडहिंग्लज कारखान्याची अवस्था दौलतसारखी झाली आहे. सेवानिवृत्त कामगारांच्या थकीत देणीसंदर्भात कंपनी व कारखाना प्रशासनाची संयुक्त बैठक तातडीने बोलवावी, अशी मागणी गोडसाखर सेवानिवृत्त कामगार संघटनेचे अध्यक्ष शिवाजी खोत यांनी पत्रकार परिषदेत केली.

याबाबत खोत यांनी सांगितले की, ब्रीस्क कंपनीने गडहिंग्लज कारखाना सहयोग तत्त्वावर चालवायला घेतला. २०१४-१५ ते ४ सप्टेंबर २०२१ दरम्यानच्या काळातील कामगारांचे रेकॉर्ड कारखान्यातून टेम्पो भरून नेले आहेत. गेली तीन वर्षे तोंडी-लेखी मागणी करूनही कारखान्याच्या प्रशासनाकडून रेकॉर्ड उपलब्ध झालेले नाहीत. त्यामुळे त्या आठ वर्षांतील सर्व रेकॉर्ड उपलब्ध करून द्यावे. आजअखेर सुमारे ७०० कामगार सेवानिवृत्त झाले आहेत. मात्र, त्यांच्या नेमणुकीची तारीख, सेवानिवृत्तीची तारीख, ग्रॅच्युईटी, शेवटचा पगार, रिटेंन्शन अलाऊन्स, रजेचा पगार व इतर देणी, आदी माहिती वेळोवेळी मागणी करूनही मिळालेली नाही. करारावेळी कंपनी व कारखाना दरम्यान झालेल्या अटी व शर्तीची पूर्ततादेखील झालेली नाही. त्याची चौकशी करून योग्य कारवाई करण्याची गरज आहे. यावेळी बाळासाहेब लोंढे, महादेव मांगले, लक्ष्मण देवार्डे, सुरेश पाटील, दिनकर खोराटे, श्रीकांत रेंदाळे, बबन पाटील, रामचंद्र पालकर, आदी उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here