कोल्हापूर : जिल्ह्यातील एका गुळ उत्पादक शेतकऱ्याने शुक्रवारी, कलरचा वापर न केलेला ३५ बॉक्स गूळ कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये आणला. मात्र, या गुळाची खरेदी झाली नाही. कमी दरानेही हा गूळ स्वीकारण्यात आला नाही. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी उत्पादनच बंद करण्याचा निर्णय घेतला. आज, शनिवारपासून गूळ उत्पादन बंदचा निर्णय घेण्यात आला आहे. बाजारात गुळ खरेदी न झाल्याने झालेल्या नुकसानीला जबाबदार कोण, असा प्रश्न शेतकरी करत आहेत.
गुजरातमध्ये कलर वापरलेल्या गुळाबद्दल निर्माण झालेल्या प्रश्नानंतर बाजार समितीने गूळ तयार करताना कलरचा वापर न करण्याच्या सूचना केल्या. शेतकऱ्यांना घातक कलर, केमिकलचा वापर न करता गूळ तयार करण्याच्या सूचना समितीने केल्या आहेत. त्यानुसार शेतकऱ्यांनी गूळ तयार केला. मात्र हा गूळ व्यापारी खरेदी करत नाहीत. त्यामुळे गुळामध्ये कलरचा वापर करायचा का नाही, याबाबात समिती – व्यापाऱ्यांनी भूमिका स्पष्ट करावी. यानंतरच गूळ उत्पादन सुरू करण्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.त्यामुळे जिल्ह्यातील गूळ उत्पादक शेतकऱ्यांनी शनिवारपासून (दि. ११) गूळ उत्पादनच बंद करण्याचा निर्णय घेतला.

















