महाराष्ट्र : ऊस उत्पादकांच्या प्रश्नांबाबत मंत्रालयात १४ रोजी सहकारमंत्र्यांसमवेत बैठकीचे आयोजन

अहिल्यानगर : ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयावर शिवसेनेचे नेते अभिजित पोटे यांनी बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसेना शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालिंदर पाटील, उपप्रदेशाध्यक्ष रवींद्र मोरे, शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र लोंढे, जयंत पवार, वसंत कदम, बाळासाहेब कदम, संजय वाघ, गणेश सातपुते आदी उपस्थित होते. यावेळी साखर आयुक्तांनी २०२६-२७ च्या ऊस गाळप हंगामापूर्वी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी १४ ऑक्टोबर रोजी मुंबई येथील मंत्रालयात सहकार मंत्र्यांसोबत शिवसेनेचे नेते अभिजित पोटे यांच्यासह १० शेतकरी प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहिती दिली.

यावेळी साखर कारखान्यांच्या डिजिटल वजन काट्यांमध्ये होणारे संभाव्य गैरप्रकार रोखण्यासाठी आयटी इंजिनिअरचा समावेश असलेले भरारी पथक नियुक्त करावे. उसाचे वजन झाल्यानंतर अवघ्या ३० सेकंदांच्या आत शेतकऱ्याच्या मोबाईलवर एसएमएसद्वारे वजनाची माहिती पाठवणे बंधनकारक करावे. सन २०२५-२६ मध्ये गाळप झालेल्या उसाला प्रति टन ५२५ रुपये दुसरा हप्ता तातडीने अदा करावा, अशा मागण्या करण्यात आल्या. कमी पावसामुळे यंदा ऊस पिकाची अपेक्षित वाढ झालेली नसल्याचे सांगत शेतकरी नेत्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी प्रति टन ५ हजार रुपये ऊस दर मिळावा अशी मागणी केली. कारखान्यांना हा दर देणे शक्य नसल्यास सरकारने प्रति टन १ हजार रुपये अनुदान जाहीर करावे, अशी मागणीही करण्यात आली.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here