कोल्हापूर : राज्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे सरकारने सातत्याने दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टीसाईडस्, सीडस् डीलर्स असोसिएशनने राज्यभरातील सर्व कृषी सेवा केंद्रे बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या ४ ते ५ वर्षांपासून विक्रेत्यांच्या विविध अडचणींबाबत कृषी विभागाकडे वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे. खरीप हंगामाच्या तोंडावरच हा संप पुकारल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसणार आहे.
नवीन बियाणे व कीटकनाशक कायद्यातील जाचक अटी शिथिल कराव्यात आणि नैसर्गिक हवामानामुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीसाठी विक्रेत्यांना जबाबदार धरू नये, अशी ठाम भूमिका संघटनेने घेतली आहे. यााबबत संघटनेने १२ प्रमुख मागण्या मांडल्या आहेत. त्यात खतांच्या पुरवठ्यातील लिंकिंग बंद करणे, अप्रमाणित कापूस बियाण्यांवर बंदी, साथी पोर्टलची सक्ती हटवणे अशा महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश आहे. खत पुरवठा एफओआर पद्धतीने करण्याचीही मागणी आहे. खरीप हंगामासाठी युरिया-डीएपी वितरणाचा फेरविचार करणे, मुदतबाह्य कीटकनाशकांची परतफेड करणे, तसेच अवैध कीटकनाशक विक्रीवर कडक बंदी आणणे या मागण्यांनाही विशेष महत्त्व देण्यात आले आहे. सरकारने या विषयात तोडगा काढणे गरजेचे आहे.


















