कोल्हापूर : हरळी येथील आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याने (गोडसाखर) सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युईटीपोटी एकूण १ कोटी ४० लाख ८ हजार ९९७ रुपये, तर हंगामी कर्मचाऱ्यांच्या सहा महिन्यांच्या रिटेन्शन अलाऊन्सपोटी ४४ लाख २५ हजार ७६७ रुपयांचा निधी ४ जून रोजी कर्मचाऱ्यांच्या बचत खात्यावर जमा केला आहे. कारखान्याच्या कार्यकारी संचालकांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. निवृत्त कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युईटीची २५ टक्के रक्कम अदा करण्यात आली आहे. तर हंगामी कर्मचाऱ्यांच्या सहा महिन्यांच्या रिटेन्शन अलाऊन्सची देयके गुरुवारी संबंधित कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
याबाबत कारखान्याच्यावतीने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात अध्यक्ष प्रकाश पताडे, उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण यांच्यासह संचालक मंडळाने म्हटले आहे की, राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याची वाटचाल सुरू असून, कामगारांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्नशील आहोत. सद्यस्थितीत हंगामी कर्मचाऱ्यांच्या रिटेन्शन अलाऊन्सवरील १२ लाख ७४ हजार २३३ रुपये इतकी भविष्य निर्वाह निधी (पीएफ) कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यावर वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तसेच, पगारावरील थकीत पीएफ भरण्यासही सुरुवात झाल्याचे कळवले आहे. निवृत्त कर्मचाऱ्यांनी संयम ठेवून कारखान्यास सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.


















