कोल्हापूर : ओलम-हेमरस कारखान्याचे नवे पाऊल, पुण्यातील ऊस प्रशिक्षणासाठी ४१ महिला रवाना

कोल्हापूर : ऊस लागवड, खत व्यवस्थापन, तण नियंत्रण, पाणी व्यवस्थापन आदी प्रत्येक टप्प्यावर महिलांचा मोलाचा सहभाग असतो. त्यामुळे आधुनिक व शास्त्रोक्त ऊस लागवड तंत्रज्ञानाची माहिती महिला शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे अत्यंत आवश्यक आहे. नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची क्षमता महिलांमध्ये अधिक असल्याने त्याचा निश्चितच ऊस उत्पादन वाढीस व कुटुंबाच्या आर्थिक उन्नतीस फायदा होईल, असा विश्वास ओलम साखर कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी सुधीर पाटील यांनी केले. ओलम कारखान्याच्यावतीने महिला शेतकऱ्यांना आधुनिक ऊस लागवड तंत्रज्ञानाची माहिती मिळावी, या उद्देशाने वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी (पुणे) येथे आयोजित करण्यात आलेल्या चार दिवसीय निवासी ‘ज्ञानलक्ष्मी’ महिला प्रशिक्षण कार्यक्रमासाठी कारखान्याकडून ४१ महिला शेतकऱ्यांना पाठविण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

ज्ञानलक्ष्मी प्रशिक्षणासाठी महिला शेतकऱ्यांना मोफत बस सुविधा उपलब्ध करून देण्यात आली, तसेच प्रशिक्षणाचा संपूर्ण खर्चही कारखान्याकडून उचलण्यात आला आहे. प्रशिक्षणादरम्यान शुद्ध बेणे निवड, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, तण नियंत्रण, कीड व रोग व्यवस्थापन, तसेच आधुनिक ऊस शेतीतील विविध तांत्रिक बाबींवर तज्ज्ञांकडून सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे. प्रशिक्षणादरम्यान महिला शेतकऱ्यांनी अभ्यासपूर्ण सहभाग घेऊन शंकांचे निरसन करून घ्यावे, तसेच मिळालेले ज्ञान इतर महिला शेतकरी भगिनींपर्यंत पोहोचवावे, असे आवाहन शेती अधिकाऱ्यांनी केले. यावेळी ऊस विकास अधिकारी रणजित सरदेसाई, नामदेव पाटील, केन ऑफिसर, फिल्ड ऑफिसर व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here