कोल्हापूर: श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या २०२६-२७ च्या गळीत हंगामातील मिल रोलर पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कारखान्याने आगामी गळीत हंगामासाठी १४ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. त्यासाठी ऊस तोडणी व वाहतूक कंत्राटदारांशी करार करण्याची, तसेच त्यांना उचल रक्कम देण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती दत्त समूहाचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी दिली. कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील सर्व ऊस तोडणी व वाहतूकदारांनी मोठ्या प्रमाणात करार करावेत. ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांनी ऊस आपल्याच कारखान्याकडे पाठवून सहकार्य करावे असे आवाहन पाटील यांनी केले.
कारखाना कार्यस्थळावर आयोजित रोलर पूजन कार्यक्रमात गणपतराव पाटील यांनी गाळप हंगाम सुरळीत पार पडावा, यासाठी सर्व यंत्रसामग्रीची देखभाल-दुरुस्ती वेगाने सुरू असल्याचे सांगितले. यावेळी कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील, व्हा. चेअरमन शरदचंद्र पाठक, कारखान्याचे संचालक अनिलकुमार यादव, बाबासो पाटील, रणजित कदम, इंद्रजित पाटील, विश्वनाथ माने, शेखर पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. बसगोंडा पाटील, अॅड. प्रमोद पाटील, निजामसो पाटील, अमर यादव, दरगू माने-गावडे, सिदगोंडा पाटील, सुरेश कांबळे, संचालक महेंद्र बागे, विजय सूर्यवंशी, प्रदीप बनगे, बाळासाहेब पाटील-हालसवडे, रावसाहेब नाईक, मंजूर मेस्त्री, कारखान्याचे कार्यकारी संचालक संजीव देसाई, सचिव अशोक शिंदे, वर्क्स मॅनेजर एस. ए. चौगुले प्रोडक्शन मॅनेजर एम. एस. जाधव प्रमुख उपस्थित होते.


















