सातारा : यशवंतराव मोहिते कृष्णा कारखान्याची पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी सहकार पॅनेलपुढे संस्थापक पॅनेलने आव्हान उभे केले आहे. प्रचार आता शिगेला पोहोचला असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ९ जून रोजी संपत आहे. याच दिवशी सत्ताधारी व विरोधकांच्या पॅनेलमधील अंतिम नावे स्पष्ट होणार आहेत. त्याचवेळी शेतकरी संघटनेच्या तीन पदाधिकाऱ्यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच दुरंगी लढतीत आता शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी रंगत आणल्याचे पहावयास मिळत असून सत्ताधाऱ्यांमध्ये काही जागांसाठी अजूनही रस्सीखेच पहावयास मिळत आहे. त्यामुळेच निवडणुकीतील अंतिम उमेदवारांबाबत उत्सुकता निर्माण झाली असून ९ जून रोजीच निवडणुकीचे अंतिम स्पष्ट होणार आहे.
काही गावांमध्ये स्थानिक पातळीवर आमदार समर्थक एक गट सत्तेत आहे, तर दुसरा गट विरोधकाची भूमिका बजावत आहे. कारखाना निवडणुकीनंतर ग्रामपंचायत निवडणुका होणार आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीतील यापूर्वीच्या उपकाराची परतफेड करण्याची चांगलीच संधी कारखाना निवडणुकीमुळे निर्माण झाली असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे. त्यामुळे गाव पातळीवर आमदार समर्थक नेते एकत्र दिसत असले, तरी आमदारांना मानणारे सर्वच कार्यकर्ते मनाने एकत्र येणार का? याबाबतही उलटसुलट चर्चा सुरू आहे. याच नाराजीचा फायदा उठविण्याची व्यूहरचना विरोधी गटाने आखल्याचे बोलले जाते. सन २०१५ मधील निवडणुकीप्रमाणे क्रॉस व्होटिंग पुनरावृत्ती टाळण्याचे मोठे आव्हान असणार आहे.
या निवडणुकीत सत्ताधारी जयवंतराव भोसले सहकारी पॅनेलने उमेदवारांची यादी अजूनही फायनल केलेली नाही. मात्र असे असले तरी काही उमेदवारांची नावे फायनल असून काही जागांसाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे उमेदवारांची नावे फायनल करताना सत्ताधाऱ्यांना विशेषतः आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांना कसरत करावी लागणार आहे. त्यामुळेच ९ मे रोजीच दुपारी सत्ताधाऱ्यांकडून कोणाचा पत्ता कट होणार ? कोणाला उमेदवारीची लॉटरी लागणार? हे स्पष्ट होणार आहे. त्याचवेळी विरोधी कृषीमहर्षी आवासाहेब मोहिते संस्थापक पॅनेलचे उमेदवार जवळपास निश्चित असले तरी ९ मे रोजी दुपारीच या पॅनेलच्या उमेदवारांची नावे सर्वासमोर येणार आहेत. त्यानंतर चिन्ह वाटप होणार असून चिन्ह सभासदांपर्यत पोहचविण्यासाठी उमेदवारांना दहा दिवसांचा अवधी मिळणार आहे. कारखान्याचे सातारा आणि सांगली जिल्ह्यातील पाच तालुक्यांचे कार्यक्षेत्र आणि त्यामधील गावांची संख्या पाहता उमेदवारांसह दोन्ही पॅनेलचा कस लागेल अशीच चिन्हे आहेत.

















