लातूर : विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखान्याला दिलेला चेक बाऊन्स झाल्याप्रकरणी लातूर अतिरिक्त दंडाधिकारी १० वे न्यायालयाने कंत्राटदार संजय शंकर शिंदे (रा. सारोळा, जि. उस्मानाबाद) याला २ महिन्यांची साधी कारावासाची शिक्षा व ३ लाख ५२ हजार ८६६ रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. संशयित संजय शिंदे याने सन २००९-१० गळीत हंगामासाठी मांजरा साखर कारखान्यासाठी ऊस तोडणी व वाहतुकीसाठी करार केला होता कंत्राटानुसार काम करण्यासाठी त्याने वेळोवेळी ऍडव्हान्स रक्कम घेतली. मात्र पैसे घेवुन करारानुसार वेळेवर काम केले नाही. त्यानंतर कारखान्याने वेळोवेळी पैशाची मागणी लावून धरल्यानंतर थकित रक्कम परतफेड करण्यासाठी संशयिताने कारखान्यास धनादेश दिला. मात्र, तो धनादेश बाऊन्स झाला.
विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्यावतीने हा खटला दाखल करण्यात आला होता. कंत्राटदाराने पैसे देण्यास टाळाटाळ केली. नंतर त्याऐवजी धनादेश दिला. मात्र, बँक खात्यात रक्कम नसल्याने अपुरी रक्कम निष्क्रिय खाते म्हणून दिलेला धनादेश परत आला. त्यामुळे कारखान्याने कायदेशीर नोटीस बजावली. संशयिताने पैसे न दिल्यामुळे कारखान्याने न्यायालयात धाव घेतली होती. तक्रारदारांच्या पुराव्याचे निरीक्षण करून न्यायालयाने आरोपीस ९ टक्के वार्षिक दराने १ लाख ८३ हजार २१६ रूपये व्याज आकारून एकूण ३ लाख ५२ हजार ८६६ रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.


















