लातूर : आगामी हंगामात जादा ऊस दर देण्याची मांजरा कारखान्याचे चेअरमन दिलीपराव देशमुख यांची ग्वाही

लातूर : विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याने गेल्या गळीत हंगामात गाळप झालेल्या उसाला ३ हजार १७७ रुपये प्रतिक्विटल बिल शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले. आता आगामी हंगामात गाळपास येणाऱ्या उसाला अधिक भाव दिला जाईल, अशी घोषणा कारखान्याचे चेअरमन व माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी केली. कारखान्याच्या अधिमंडळाची ४२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा दिलीपराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील पार्वती मंगल कार्यालयात झाली. यावेळी ते बोलत होते. आमदार अमित देशमुख, महापौर जयश्री सोनकांबळे, माजी आमदार धीरज देशमुख, वैजनाथ शिंदे, मांजरा कारखान्याचे व्हाइस चेअरमन अशोक काळे, राज्य साखर महासंघाचे संचालक आबासाहेब पाटील, लक्ष्मण मोरे, जगदीश बावणे, अनंतराव देशमुख, शाम भोसले, श्रीशैल उटगे, प्रमोद जाधव आदी उपस्थित होते.

माजी मंत्री देशमुख यांनी शेतकऱ्यांचे दैनंदिन जीवन सुधारले पाहिजे, याला कायमच ‘मांजरा परिवारा’ने पहिले प्राधान्य दिले. शेतकरी आणि कारखान्याचे व्यवस्थापन, कर्मचारी यांचे हित जोपासण्यावर आम्ही अधिक भर दिला. त्यामुळे मांजरा परिवाराची भक्कम वाटचाल सुरू असल्याचे सांगितले. यावेळी अमित देशमुख म्हणाले, लोकनेते विलासराव देशमुख यांनी चार दशकापूर्वी मांजरा कारखान्याची उभारणी केली. त्यांनी उभे केलेले कार्य खऱ्या अर्थाने दिलीपराव देशमुख यांनी पुढे नेले आहे. त्यामुळेच मांजरा परिवारातील सर्व कारखाने उत्तम चालतात. आगामी काळातही याच पद्धतीचा उत्तम कारभार करून सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्याचे काम मांजरा परिवाराच्या माध्यमातून होत राहील. माजी आमदार धीरज देशमुख यांनी लातूर जिल्ह्यात नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर प्रोत्साहनपर अनुदान द्यावे, यासाठी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्याकडे आम्ही सतत पाठपुरावा करत आहोत असे सांगितले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here