लातूर : ऊस तोडणी, वाहतुकीच्या नावाखाली तोंडार (ता. उदगीर) येथील विलास सहकारी साखर कारखान्याकडून उचल (अॅडव्हान्स) घेऊन करारानुसार काम न करता आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी ७९ ठेकेदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एक एप्रिल २०२२ ते एक एप्रिल २०२५ या तीन वर्षांच्या कालावधीत हा प्रकार घडला. मिळालेल्या माहितीनुसार, विलास सहकारी साखर कारखान्याच्या (युनिट क्रमांक दोन) प्रशासनाने गाळप हंगामासाठी ऊस तोडणी, वाहतुकीसाठी विविध ७९ ठेकेदारांशी (मुकादम) लेखी करार केले होते. या कामासाठी कारखान्याने ठेकेदारांना मोठी उचल दिली होती. मात्र, रक्कम हाती आल्यानंतर काहींनी मध्येच काम सोडून दिले, तर काही ठेकेदार कामावर हजरच राहिले नाहीत.
कारखान्याने वारंवार पाठपुरावा करूनही संबंधित ठेकेदारांनी ना काम केले, ना घेतलेली रक्कम परत केली. कारखाना प्रशासनाने दिलेल्या तक्रारीवरून उदगीर पोलिस ठाण्यात ७९ संशयित ठेकेदारांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यात राम बाबू चव्हाण, मारोती राम राठोड, श्रीराम रामचंद्र राठोड (रा. चाटोरी, ता. पालम, जि. परभणी), तुकाराम सीताराम पवार (रा. राळगा, ता. अहमदपूर), पंढरीनाथ भानुदास बनसोडे (रा. लोहारा, ता. उदगीर), बाबासाहेब हरिभाऊ राठोड, अजय परसराम जाधव (जि. बीड), खोब्राजी आनंदा जोंधळे (जि. नांदेड), मोसीन रफीक शेख, रमेश अंबादास बडे (जि. बीड) आदींचा समावेश आहे.


















