पुणे : राजगड सहकारी साखर कारखान्याची ३६वी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखाना कार्यस्थळावर अध्यक्ष, माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. पुरेशी गणसंख्या नसल्याने सभा तहकूब करून पुन्हा त्याच ठिकाणी घेण्यात आली. यावेळी राजगड सहकारी साखर कारखान्याच्या राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाकडील (एनसीडीसी) कर्जप्रस्तावाला मंजुरी देण्याचा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. लवकरच कर्ज उपलब्ध होऊन कारखाना नव्याने उभा राहील, असा विश्वास थोपटे यांनी व्यक्त केला. याबाबत संचालक मंडळासह मागील आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांच्या कार्यपद्धतीवर आमचा पूर्ण विश्वास असून, कोणीही मनात किंतु न बाळगता सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यकारी संचालक सर्जेराव पाटील यांनी सभेच्या कार्यक्रमपत्रिकेवरील विषय मांडले. त्याला सभासदांनी मंजुरी दिली. यावेळी अध्यक्ष संग्राम थोपटे म्हणाले की, कारखान्याचे संस्थापक, दिवंगत नेते अनंतराव थोपटे यांनी सर्वांच्या सहकार्याने जिद्दीने कारखाना उभा केला. अनेक आर्थिक अडचणी आल्या तरी दोन्ही तालुक्यांतील शेतकऱ्यांसाठी हा कारखाना पुन्हा नव्याने उभा राहावा, हे त्यांचे स्वप्न होते. त्यांचे स्वप्न आणि सभासद शेतकऱ्यांचे हित जोपासण्यासाठी शेवटपर्यंत लढत राहील. कागदपत्रांमधील त्रुटींमुळे कर्ज मंजुरी थांबली होती.
महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या मान्यतेने ४६७ कोटी ८५ लाख रुपयांचा कर्जाचा प्रस्ताव एनसीडीसीकडे मंजुरीसाठी प्रलंबित आहे. सर्व कागदपत्रांची पूर्तता करून प्रस्ताव पुन्हा सादर केला असून, तो सध्या केंद्रीय सहकार मंत्र्यांकडे आहे असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी उपाध्यक्ष पोपटराव सुके, कार्यकारी संचालक सर्जेराव पाटील, संचालक किसनराव सोनवणे, शिवाजीराव कोंडे, दिनकर धरपाळे, विकास कोंडे, प्रताप शिळीमकर, सुभाष कोंढाळकर, उत्तम थोपटे, सुधीर खोपडे, अरविंद सोंडकर, दत्तात्रय चव्हाण, संदीप नगिणे, शोभा जाधव, सुरेखा निगडे, अशोक शेलार, चंद्रकांत सागळे यांच्यासह भाजपाचे जिल्हा पदाधिकारी बाळासाहेब गरुड, तालुकाध्यक्ष संतोष धावले व सभासद उपस्थित होते. राजू शेटे यांनी सूत्रसंचालन केले. संचालक शिवाजी कोंढाळकर यांनी आभार मानले.


















