इथेनॉलमुळे पेट्रोल-डिझेल आयातदारांची लॉबी माझ्यावर नाराज; माझ्याविरोधात पेड कॅम्पेन सुरू : मंत्री नितीन गडकरी

मुंबई : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी इथेनॉलसह पर्यायी इंधनांच्या वापराचे पुन्हा एकदा जोरदार समर्थन केले आहे. ‘एबीपी माझा’च्या सन्मान सोहळ्यात बोलताना त्यांनी सांगितले की, भारत दरवर्षी सुमारे २२ लाख कोटी रुपयांचे पेट्रोल, डिझेल आणि गॅस आयात करतो. अशा परिस्थितीत इथेनॉल आणि अन्य बायोफ्युएलचा वापर वाढवणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गडकरी म्हणाले, देशातील सुमारे ४० टक्के वायू प्रदूषण हे वाहनांमुळे होते. जागतिक घडामोडी आणि युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधनाच्या किमतींवर होणारा परिणाम लक्षात घेता भारताने ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर होणे आवश्यक आहे. २००४ पासून मी पर्यायी इंधन आणि बायोफ्युएलला चालना देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, मी केवळ इथेनॉलच नव्हे तर हायड्रोजन आणि इलेक्ट्रिक वाहनांनाही प्रोत्साहन दिले आहे. माझ्याकडे स्वतः इथेनॉल आणि हायड्रोजनवर चालणारी वाहने आहेत. देशात इलेक्ट्रिक कार, दुचाकी आणि ट्रॅक्टरच्या वापरालाही चालना देण्यात आली आहे. पर्यायी इंधनांच्या धोरणामुळे भारताने ऑटोमोबाईल क्षेत्रात मोठी झेप घेतली असून जगात सातव्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर पोहोचत जपानलाही मागे टाकले आहे, असा दावा त्यांनी केला. इथेनॉलबाबत सोशल मीडियावर सुरू असलेल्या टीकेवर प्रतिक्रिया देताना गडकरी म्हणाले की, माझ्याविरोधात सुरू असलेला प्रचार हा पेड कॅम्पेन आहे. इंधन आयात करणाऱ्या काही हितसंबंधी गटांकडून हा प्रचार केला जात असून इथेनॉलमुळे त्यांचा व्यवसाय धोक्यात येईल, अशी त्यांना भीती वाटत आहे.

ChiniMandi WhatsApp Channel

देशात दरवर्षी सुमारे १,५०० कोटी लिटर इथेनॉलची गरज असल्याचे सांगताना त्यांनी स्पष्ट केले की, इथेनॉलचे दर सरकार निश्चित करते आणि टेंडर प्रक्रियेद्वारे त्याची खरेदी केली जाते. पुढील पाच ते सहा महिन्यांत देशातील शेतकरी विमानांसाठी लागणारे एव्हिएशन फ्युएल तयार करण्यासाठीही योगदान देतील. त्यामुळे भविष्यात शेतकरी केवळ अन्नदाता नव्हे, तर इंधनदाता म्हणूनही ओळखला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

इथेनॉल, मिथेनॉल आणि विविध बायोफ्युएलच्या वापरामुळे भारताची परदेशी इंधनावरील अवलंबित्व मोठ्या प्रमाणात कमी होईल, असेही गडकरी म्हणाले. देशातील इंधन आयातीच्या टेंडरमधून मोठा व्यवसाय करणाऱ्या काही घटकांना इथेनॉलमुळे फटका बसेल, त्यामुळेच ते माझ्याविरोधात प्रचार करत आहेत. मात्र अशा टीकेची मला कोणतीही चिंता नाही. या आरोपांमध्ये कोणतीही तथ्य नाहीत आणि मी माझे काम सुरूच ठेवणार आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here