पुणे : राज्यातील ऊस गळीत हंगाम २०२५-२६ मध्ये सहभागी असलेल्या २१० साखर कारखान्यांपैकी १६२ कारखान्यांकडून एफआरपीची शंभर टक्के रक्कम देण्यात आली असली तरी ३० जूनअखेरच्या अहवालानुसार, ४८ कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे २९८ कोटी रुपये थकीत आहेत. राज्यातील साखर कारखान्यांनी आतापर्यंत ९९.२६ टक्के एफआरपी दिली आहे.
राज्यात एप्रिलअखेर १० कोटी ४५ लाख ६३ हजार टनांइतके ऊस गाळप झाले. ऊसतोडणी व वाहतूक खर्चासह शेतकऱ्यांना देय एफआरपीची रक्कम ४० हजार ४४६ कोटी रुपये होती. कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ४०,१४८ कोटी रुपये जमा केले. ही रक्कम ९९.२६ टक्के इतकी होते. सद्यःस्थितीत ४८ कारखान्यांकडे २९८ कोटी रुपये थकीत राहिले आहेत. ही रक्कम वसूल करण्यासाठी आयुक्तालयाचा पाठपुरावा सुरू आहे.
दहा कारखान्यांवर आरआरसी अंतर्गत कारवाई, तीन कारखान्यांनी दिली बिले…
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वेळेत एफआरपी देण्यात अपयशी ठरलेल्या राज्यातील दहा साखर कारखान्यांवर साखर आयुक्त कार्यालयाकडून आरआरसी अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील गोकुळ शुगर्स, भीमा सहकारी साखर कारखाना, श्री संत कुमसदास सहकारी साखर कारखाना, कमलाभवानी ग्लोबल कॉपो. लिमिटेड, धाराशिव जिल्ह्यातील भीमाशंकर शुगर मिल्स लिमिटेड, श्री. विठ्ठलसाई सहकारी साखर कारखाना, अहिल्यानगर जिल्ह्यातील केदारेश्वर सहकारी साखर कारखाना, नाशिक जिल्ह्यातील एस. जे. शुगर डिस्टलरी आणि अष्टलक्ष्मी शुगर इथेनॉल तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सचिन घायाळ शुगर्सवर कारवाईची बडगा उगारण्यात आला होता.
साखर आयुक्त कार्यालयाने कारवाईची बडगा उगारल्यानंतर कमलाभवानी ग्लोबल कॉपो. लिमिटेड, भीमाशंकर शुगर मिल्स लिमिटेड आणि केदारेश्वर सहकारी साखर कारखाना प्रशासनाने ऊस उत्पादकांची पूर्ण बिले दिली आहेत. तर एफआरपीची थकीत १९ कोटी ४९ लाख २७ हजार रुपयांची रक्कम न भरल्याप्रकरणी संत एकनाथ- सचिन घायाळ शुगर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या जप्त मालमत्तेचा तब्बल ८ कोटी ९ लाख रुपयांना जाहीर लिलाव करण्यात आला आहे.


















