परभणी : ऊसतोड मजुरांसोबत स्थलांतरित होणाऱ्या बालकांना आरोग्याच्या मूलभूत सुविधा सहज उपलब्ध व्हाव्यात, यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाकडून विशेष ‘बालसंजीवनी अभियान’ राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत साखर कारखान्यांचा परिसर, ऊसतोड सुरू असलेली शेतं आणि मजुरांच्या तात्पुरत्या वस्त्यांमध्ये जाऊन बालकांची आरोग्य तपासणी, लसीकरण आणि आवश्यक उपचार करण्यात येणार आहेत. यासंदर्भात आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांना लेखी निर्देश दिले आहेत.
राज्यातील विविध भागांतील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू झाल्याने ऊसतोड मजूर आपल्या कुटुंबांसह कामासाठी स्थलांतरित झाले आहेत. या मजुरांसोबत मोठ्या संख्येने लहान मुलेही असतात. मात्र, तात्पुरत्या वस्त्यांमध्ये राहावे लागत असल्याने या बालकांना नियमित आरोग्य तपासणी आणि लसीकरणाचा लाभ मिळण्यात अडचणी निर्माण होतात. ही समस्या लक्षात घेऊन आरोग्य विभागाने बालसंजीवनी अभियानाची आखणी केली आहे.राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत (आरबीएसके) स्थलांतरित प्रत्येक बालकाची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. यामध्ये कुपोषण, रक्तक्षय, बालविकासातील विलंब, जन्मजात व्यंग आणि विविध संसर्गजन्य आजारांची तपासणी करण्यात येईल. तपासणीदरम्यान आजार आढळलेल्या बालकांना आवश्यक उपचारही उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी संबंधित भागातील आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेवक, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका आणि साखर कारखाना व्यवस्थापन यांची मदत घेतली जाणार आहे. राज्यातील सर्व साखर कारखान्यांची यादी तयार करणे, ऊसतोड मजुरांच्या पालांचे आणि तात्पुरत्या वस्त्यांचे सर्वेक्षण करणे, तसेच त्याच ठिकाणी आवश्यक लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मजुरांच्या बालकांची आरोग्यासाठी होणारी फरफट थांबणार
ऊसतोड मजुरांना वर्षातील अनेक महिने कुटुंबासह घरापासून दूर राहून काम करावे लागते. अशा परिस्थितीत लहान मुलांना आरोग्य केंद्रात नेणे, नियमित तपासणी करून घेणे आणि वेळेवर लसीकरण करणे अनेकदा शक्य होत नाही. कामाच्या व्यापामुळे बालकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होण्याची शक्यताही असते. ही अडचण दूर करण्यासाठी आरोग्य सेवा थेट ऊसतोड मजुरांच्या पालांपर्यंत पोहोचविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बालकांना आजारपणात उपचारांसाठी करावी लागणारी धावपळ थांबविणे, वेळेवर आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे आणि त्यांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे हा या अभियानाचा प्रमुख उद्देश असल्याचे आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी स्पष्ट केले.
















