पुणे : बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या पॅनेलने आघाडी घेतली आहे. निंबूत-खंडाळा गटातील तिन्ही उमेदवार विजयी झाले आहेत. यामध्ये अभिजीत काकडे, प्रमोद काकडे आणि वसंतराव दगडे यांचा समावेश आहे. यापूर्वी ब वर्ग गटातून संग्राम सोरटे यांनी विजय मिळवला होता. त्यामुळे आतापर्यंत २१ पैकी चार जागांवर सुनेत्रा पवार यांच्या पॅनेलने विजय मिळवला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंडखोरी करून भाजपच्या मदतीने स्वतंत्र पॅनेल उभे करणारे कारखान्याचे विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगताप पिछाडीवर असल्याची माहिती समोर आली आहे.
पुरुषोत्तम जगताप सुमारे दीड हजार मतांनी पिछाडीवर
‘एबीपी माझा’ने दिलेल्या वृत्तानुसार, पुरुषोत्तम जगताप हे जवळपास दीड हजार मतांनी पिछाडीवर असल्याचे समजते. जगताप यांनी भाजपच्या मदतीने सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत स्वतंत्र पॅनेल उभे केले होते.दुसरीकडे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या पॅनेलचे तिन्ही उमेदवार आघाडीवर असल्याचे वृत्त आहे. सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत सर्व २१ जागांवर विजय मिळवण्याचा विश्वास सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला आहे.
२१ जागांसाठी रविवारी झाले चुरशीने मतदान
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या २१ जागांसाठी रविवारी मतदान पार पडले. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंडखोरी करत पुरुषोत्तम जगताप यांनी भाजपच्या मदतीने स्वतंत्र पॅनेल उभे केले होते. तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे पॅनेल निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पॅनेल युगेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक लढवत आहे.सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याकडे बारामती तालुक्यासह सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे. मतमोजणीच्या पुढील फेऱ्यांनंतर निवडणुकीचे संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे.


















