पुणे : साखर निर्यातीवर बंदी घालण्याच्या निर्णयामुळे साखर उद्योग अडचणीत आला असून, देशांतर्गत साखरेच्या किमतीदेखील घसरल्या आहेत. केंद्र सातत्य सरकारच्या निर्णयांमध्ये नसल्याने निर्यातीबाबतही आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची प्रतिमा मलिन होत आहे. ऊस नियंत्रण कायद्याच्या मसुद्याबाबत देण्यात आलेल्या सूचनांमध्ये साखर उद्योगासंदर्भात घेण्यात येणाऱ्या निर्णयांपूर्वी कारखान्यांच्या शिखर संस्थेची विचारविनिमय करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. केंद्र सरकारने साखर निर्यातबंदीच्या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे. यंदाच्या गाळप हंगामात देशातील ५४१ पैकी ५३८ कारखान्यांचे गाळप पूर्ण झाले आहे. आतापर्यंत २,८७२ लाख टन उसाचे गाळप करून २७४.६५ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे अशी माहितीही त्यांनी दिली.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की, आतापर्यंत केवळ साडेसहा लाख टन साखर निर्यात झाली आहे, तर अडीच लाख टन निर्यातीचे करार झाले आहेत. केंद्र सरकारच्या निर्यातबंदीनंतर आता ६ लाख टन साखरेचा प्रश्न निर्माण होणार आहे. करारादरम्यान घेतलेल्या आगाऊ रकमेची परतफेड कशी करायची, असा प्रश्न साखर कारखान्यांसमोर उभा राहिला आहे. केंद्राने उसाची एफआरपी वाढविण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्याचवेळी साखरेच्या विक्री किमतीबाबतही निर्णय घेणे अपेक्षित होते. ती न वाढल्याने कारखान्यांचा तोटा वाढणार आहे. गेली दोन वर्षे राज्यात गाळप हंगाम १ नोव्हेंबर रोजी सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे साखर उतारा चांगला मिळत असल्याचे निरीक्षण महासंघाने नोंदविले आहे. ऑक्टोबरमध्ये हंगामास सुरुवात केल्यास शेतकऱ्यांना उत्पादन कमी मिळते, तसेच कारखान्यांनाही उतारा कमी मिळत असल्याचे पाटील यावेळी म्हणाले.


















