पुणे : गेल्या काही वर्षांत गुळाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर बदलला आहे. पूर्वी शेतकरी स्वतःच्या शेतातील ऊस किंवा शेजारील शेतकऱ्यांकडून ऊस घेऊन गुऱ्हाळात गूळ तयार करीत होते. मात्र, आता या व्यवसायाला व्यावसायिक आणि औद्योगिक स्वरूप आले आहे. मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करून प्रतिदिन शेकडो टन उसाचे गाळप करणारे प्रकल्प राज्यात सुरू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर गूळ उद्योगासाठी स्वतंत्र कायदा करण्याचा निर्णय घेण्यात आला. साखर आयुक्तालयाने गूळ उद्योगाला कायद्याच्या चौकटीत आणण्यासाठी स्वतंत्र कायद्याचा मसुदा साखर आयुक्तालयाने शासनाकडे पाठविण्यात आला. शासनाने त्यामध्ये काही दुरुस्त्या व बदल सुचवले. त्यावर या आठवड्यात बैठक होण्याची शक्यता असून, सुधारित मसुदा पुन्हा शासनाला पाठविण्यात येणार आहे.
सध्या मोठ्या गूळ उत्पादन प्रकल्पांच्या कामकाजावर साखर कारखान्यांप्रमाणे स्वतंत्र नियंत्रण व्यवस्था नाही. त्यामुळे ऊस खरेदीची पद्धत, शेतकऱ्यांना दिला जाणारा दर, उत्पादन प्रक्रिया, प्रदूषण नियंत्रण तसेच अन्य औद्योगिक नियमांचे पालन याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. प्रस्तावित कायद्यानुसार प्रतिदिन २५ टन किंवा त्यापेक्षा अधिक ऊस गाळप क्षमता असलेल्या गूळ उत्पादन प्रकल्पांचा कायद्याच्या कक्षेत समावेश होऊ शकतो. आता शासनस्तरावर मसुद्याचा विचार केल्यानंतर काही तरतुदींमध्ये दुरुस्ती तसेच अधिक विचारविनिमयाची आवश्यकता असल्याचे स्पष्ट करण्यात आले. शासनाच्या सूचनांनुसार मसुद्यात आवश्यक बदल केले जाणार आहेत. यासाठी संबंधित विभाग आणि अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येणार आहे. याबाबत साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी सांगितले की, गूळ उद्योगासाठी प्रस्तावित कायद्याचा मसुदा शासनाला पाठवला होता. शासनाकडून काही दुरुस्त्या आणि बदल सुचविण्यात आले आहेत. त्यावर संबंधितांशी चर्चा करून आवश्यक बदल केले जातील. यासंदर्भात या आठवड्यात बैठक होईल, त्यानंतर सुधारित मसुदा शासनाला पाठविण्यात येईल.


















