महाराष्ट्र : खासगी साखर कारखान्यांचे थकीत ४९२ कोटींचे अनुदान देण्याची ‘विस्मा’ची मागणी

पुणे : राज्यात आता सहकारी कारखान्यांपेक्षाही खासगी कारखान्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे खासगी कारखान्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या (विस्मा) भूमिकेकडे साखर उद्योगाचे लक्ष लागून असते. ‘विस्मा’चे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी अलीकडेच साखर आयुक्तालयाला पत्र लिहून काही मुद्द्यांकडे लक्ष वेधले आहे.

केंद्र शासनाने २०१४-१५ हंगामातील थकीत एफआरपी देण्यासाठी ‘सॉफ्टलोन २०१५’ नावाने योजना आणली. ती देशातील सर्व सहकारी व खासगी साखर कारखान्यांना लागू होती. मात्र, राज्याने फक्त सहकारी कारखान्यांना सवलत दिली. खासगी कारखान्यांचे चार वर्षांचे ४९२ कोटींची व्याज अनुदान राज्याने थकवले आहे. खासगी कारखान्यांनादेखील अनुदान रक्कम मिळाली पाहिजे अशी मागणी ‘विस्मा’ने केली आहे.

ChiniMandi WhatsApp Channel

‘विस्मा’ने केंद्र शासन साखर उद्योगांना सवलती देताना खासगी व सहकारी साखर कारखान्यांमध्ये भेदभाव करत नाही. राज्य सरकारनेदेखील तसेच धोरण ठेवावे, असा आग्रह धरला आहे. याबाबत पत्रामध्ये म्हटले आहे की, चालू गाळप हंगाम २०२५-२६ साठी सॉफ्टलोन, आर्थिक सूट तसेच इतर सवलती देताना केंद्राप्रमाणेच सहकारी व खासगी साखर कारखान्यासाठी राज्याचे धोरण समसमान असावे. सवलती देताना भेद करू नये.

यंदा ऊस गाळप लवकर सुरू केले जात आहे. त्यामुळे १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर यांदरम्यान कारखान्याचा सरासरी साखर उतारा एक ते दीड टक्क्याने घटेल. यातून प्रति टन ५०० रुपयांचे नुकसान होईल. अपरिपक्व ऊस तुटल्याने शेतकऱ्यांचे प्रति टन ३५० रुपयांपर्यंत आर्थिक नुकसान होईल. त्यामुळे कारखान्यांमधील साखर उतारा घट व शेतकऱ्यांच्या ऊस वजनातील घट या दोन्ही बाबींसाठी राज्य व केंद्राने प्रति टन ७५० रुपयांचे विशेष अर्थसाह्य मंजूर करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here