महाराष्ट्र : ऊसतोडणी कामगार महिला बनल्या ‘डॉक्टर ताई’; सांभाळत आहेत आरोग्याची जबाबदारी

बीड : बीड जिल्हा प्रशासनाने महिला ऊसतोड कामगार संघटनेच्या सहकार्याने स्थलांतरित ऊसतोड कामगारांना प्राथमिक आरोग्यसेवा मिळावी या उद्देशाने ‘आरोग्य साथी’ हा पायलट प्रकल्प सुरू केला आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक १०० ऊसतोड कामगारांमागे एका महिला स्वयंसेविकेची निवड ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आली. त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रांशी जोडून प्रशिक्षण आणि आवश्यक मार्गदर्शन देण्यात आले. जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार या उपक्रमात ९२३ महिला ऊसतोड कामगारांची निवड करण्यात आली.

‘द इंडियन एक्स्प्रेस’मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, दरवर्षी बीड जिल्ह्यातील कठोड़ा गावातील ३२ वर्षीय साधना सतीश वाघमारे सहा महिन्यांसाठी कोल्हापूर आणि कर्नाटक परिसरात ऊसतोडणीसाठी स्थलांतर करतात. या काळात साखर कारखान्यांजवळ उभारलेल्या तात्पुरत्या मजूर वस्त्यांमध्ये आरोग्यसेवा मिळवणे ही त्यांच्यासाठी मोठी समस्या ठरते.“काम करताना हाताला जखम होणे, ताप, अंगदुखी, बुरशीजन्य संसर्ग किंवा जुलाब अशा समस्या वारंवार होतात. पण मजुरीत कपात होऊ नये म्हणून आम्हाला काम सुरूच ठेवावे लागते. ऊसाच्या शेतात उपचार मिळवणे खूप कठीण असते,” असे साधना वाघमारे यांनी सांगितले. त्या नुकत्याच कोल्हापूरातील डालमिया साखर कारखान्यातील कामावरून परतल्या आहेत. यंदा मात्र साधना घरी परतल्या त्या एका फर्स्ट-एड किटसह आणि नव्या ओळखीने. आता गावात त्यांना सगळेजण प्रेमाने ‘डॉक्टर ताई’ म्हणू लागले आहेत. साधना या ‘आरोग्य साथी’ या उपक्रमांतर्गत प्रशिक्षण घेतलेल्या महिलांपैकी एक आहेत.

ChiniMandi WhatsApp Channel

साधना सांगतात की, या प्रशिक्षणामुळे महिलांना शेतातच प्राथमिक उपचार देणे शक्य झाले. “एखाद्याला दुखापत झाली तर जखम आयोडीन किंवा डेटॉलने स्वच्छ करणे, त्यावर औषध लावून पट्टी बांधणे आम्हाला शिकवले. दुखापत गंभीर असेल तर तातडीने जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन जायचे. ताप, सर्दी, खोकला, घशाचा त्रास, जुलाब, उलट्या यासाठी कोणती प्राथमिक औषधे द्यायची हेही आम्हाला शिकवले. मासिक पाळीदरम्यान महिलांना होणाऱ्या अडचणी आणि स्वच्छतेबाबतही मार्गदर्शन करण्यात आले,” असे त्यांनी सांगितले.

बीड, हिंगोलीसारख्या दुष्काळग्रस्त भागांमधून दरवर्षी हजारो ऊसतोड कामगार पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटकात स्थलांतर करतात. हे कामगार तात्पुरत्या वस्त्यांमध्ये राहतात, जिथे पिण्याचे पाणी, स्वच्छता, शौचालये आणि आरोग्य सुविधा अत्यंत मर्यादित असतात. ‘आरोग्य सखी’ या मूळ संकल्पनेची सुरुवात सुमारे तीन वर्षांपूर्वी महिला ऊसतोड कामगार संघटनेने MAKAAM, SOPPECOM आणि SATHI-अनुसंधान ट्रस्ट यांच्या सहकार्याने केली होती. त्यानंतर हा प्रस्ताव शासनाकडे मांडण्यात आला.

संघटनेच्या मनीषा टोकले यांनी सांगितले की, या उपक्रमामुळे ऊसतोड कामगारांची खासगी दवाखाने आणि मेडिकल दुकानांवरील अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यांच्या मते, “लहानसहान आजारांसाठीही कामगारांना खासगी दवाखान्यांवर अवलंबून राहावे लागत होते. त्यामुळे आधीच कर्जबाजारी असलेल्या कुटुंबांवर आणखी आर्थिक ताण वाढत होता. हीच पोकळी भरून काढण्यासाठी हा प्रयोग सुरू करण्यात आला.”

बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांनी सांगितले की, ऊसतोड कामगारांमध्ये वारंवार दिसणाऱ्या आजारांचा अभ्यास करून प्रशिक्षणाची रचना करण्यात आली. त्वचारोग, ताप, अंगदुखी आणि कामादरम्यान होणाऱ्या दुखापती यावर विशेष भर देण्यात आला.मात्र सामाजिक कार्यकर्ते आणि काही महिला कामगारांनी योजनेच्या सरकारी अंमलबजावणीत काही त्रुटी असल्याचे सांगितले आहे. प्रशिक्षण घाईघाईत पार पडले, औषधांचा पुरेसा साठा मिळाला नाही आणि नंतर औषधांचा पुरवठाही नियमित झाला नाही, अशी तक्रार त्यांनी केली.

साधना वाघमारे यांनीही सांगितले की, दिलेली औषधे काही दिवसांतच संपली कारण संपूर्ण कामगार गट एका किटवर अवलंबून होता. सामाजिक कार्यकर्त्या सीमा कुलकर्णी यांनी सांगितले की, मासिक पाळी आणि महिलांचे प्रजनन आरोग्य हा या उपक्रमाचा महत्त्वाचा भाग होता. अनेक महिला वेदना आणि आजार असूनही सतत कष्टाची कामे करत राहतात. त्यांना आरोग्याविषयी जागरूक करणे आणि अनावश्यक शस्त्रक्रियांपासून दूर ठेवणे हा या उपक्रमाचा उद्देश होता.बीडचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उल्हास गांदल यांनी सांगितले की, ऊसतोडणीहून परतलेल्या महिलांशी चर्चा करून या योजनेतील उणिवा समजून घेतल्या जातील. त्यानंतर हा उपक्रम आणखी व्यापक करण्याचा प्रशासनाचा विचार आहे. यासाठी अतिरिक्त निधीची मागणीही करण्यात आली आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here