अहिल्यानगर : सहकारी साखर कारखान्यांना बायो-सीबीजी प्रकल्प उभारण्यासाठी केंद्र सरकारकडून मिळणारे पाठबळ आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेला बळ देणारे आहे. अशा प्रकल्पांमुळे देशाला ऊर्जा क्षेत्रात स्वावलंबी होण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी व्यक्त केला.
पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे सहकारी साखर कारखान्याने केंद्र सरकारच्या गोवर्धन योजनेअंतर्गत प्रतिदिन १६ टन क्षमतेचा बायो-सीबीजी प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पाचा भूमिपूजन समारंभ पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के होते. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे-पाटील, उपाध्यक्ष सोपानराव शिरसाठ, सभापती ज्ञानेश्वर गोंदकर, नगराध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मंत्री विखे-पाटील यांनी कारखान्याच्या नियोजनाचे कौतुक केले. बायो-सीबीजी प्रकल्प उभारण्याचा निर्णय हा धाडसी आणि दूरदृष्टीचा असल्याचे त्यांनी सांगितले. ऊर्जा क्षेत्रात स्वावलंबी होण्याच्या दिशेने कारखान्याने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे.
या प्रकल्पासाठी वाया जाणाऱ्या जैविक कचऱ्याचा आणि उपलब्ध संसाधनांचा उपयोग केला जाणार आहे. त्यामुळे कचऱ्याचे उपयुक्त ऊर्जेत रूपांतर होण्यास मदत होणार असून, पर्यावरण संरक्षणासोबतच पर्यायी ऊर्जा निर्मितीलाही चालना मिळणार आहे. सहकारी साखर कारखान्यांनी अशा आधुनिक प्रकल्पांच्या माध्यमातून ऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रात पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी प्रतिपादन केले.


















