नवी दिल्ली : देशातील मान्सूनमध्ये गेल्या काही आठवड्यांत लक्षणीय सुधारणा झाली असून पावसातील तूट मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. मात्र, खरीप हंगामातील पेरणीचा वेग अद्यापही मंद असल्याने कृषी क्षेत्रासाठी ही चिंतेची बाब असल्याचे कॅपिटल 360च्या अहवालात म्हटले आहे. अहवालानुसार, बुधवारीपर्यंत देशातील एकूण पावसाची तूट सामान्यपेक्षा 15 टक्के होती. आठवडाभरापूर्वी ही तूट 38 टक्के होती. 8 जुलै रोजी संपलेल्या आठवड्यात देशात 83.6 मिमी पाऊस झाला, तर या कालावधीतील सरासरी पाऊस 57.5 मिमी इतका असतो. म्हणजेच या आठवड्यात सामान्यपेक्षा 45 टक्के अधिक पाऊस झाला.
अहवालानुसार, पावसाचा भौगोलिक विस्तारही वाढला आहे. देशातील 36 हवामान विभागांपैकी 25 विभागांमध्ये सामान्य किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस नोंदवला गेला आहे. तसेच देशातील सुमारे 49 टक्के जिल्ह्यांमध्ये सामान्य किंवा अतिरिक्त पाऊस झाला आहे. पावसात सुधारणा झाली असली तरी खरीप पेरणीचा वेग अजूनही समाधानकारक नाही. रविवारीपर्यंतची आकडेवारी पाहता, मागील वर्षाच्या तुलनेत खरीप पेरणी 20.8 टक्क्यांनी कमी झाली आहे.पीक निहाय स्थिती पुढीलप्रमाणे आहे— तेलबिया: 39.3% घट, कापूस: 22.9% घट, कडधान्ये: 21.8% घट, भरड धान्ये: 16.4% घट ,भात: 13.1% घट झाली आहे. याउलट, ऊस हे एकमेव प्रमुख पीक ठरले असून त्याच्या लागवडीत 1.6 टक्क्यांची किरकोळ वाढ नोंदवण्यात आली आहे.
अहवालानुसार, देशातील प्रमुख धरणांमधील पाणीसाठ्यातही सुधारणा झाली आहे. गुरुवारीपर्यंत जलाशयांमध्ये एकूण क्षमतेच्या 32.4 टक्के पाणी उपलब्ध होते, जे मागील आठवड्यापेक्षा अधिक आहे. तथापि, हा साठा मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत 36 टक्के कमी आहे. मात्र, गेल्या 10 वर्षांच्या सरासरीपेक्षा 7.5 टक्के अधिक पाणीसाठा उपलब्ध असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. अहवालात म्हटले आहे की, पावसात झालेल्या वाढीमुळे मान्सूनची परिस्थिती सुधारली असली तरी खरीप पेरणीचा वेग आणि देशभरातील पावसाचे समतोल वितरण हे आगामी आठवड्यांत कृषी क्षेत्रासाठी निर्णायक ठरणार आहे. या दोन्ही बाबींवर कृषी क्षेत्राचे विशेष लक्ष राहणार आहे.


















