नांदेड : व्ही. पी. के. उद्योग समूहाच्या कुसुमनगर, वाघलवाडा येथील साखर कारखान्याला सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी नुकतीच भेट दिली. कारखान्याच्या प्रगतीचा आढावा त्यांनी घेतला. या भेटीदरम्यान त्यांनी अध्यक्ष मारोतराव कवळे गुरुजी यांच्या कार्याचे विशेष कौतुक करत त्यांच्या उद्योगशीलतेचा गौरव केला. बाबासाहेब पाटील यांनी यावेळी ऊस लागवडीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, उत्पादनवाढीसाठी पूरक व्यवसायांची गरज तसेच साखर उद्योगातील सध्याच्या आव्हानांवर मार्गदर्शन केले. साखरेच्या दरातील चढ-उतार, शासन नियमांनुसार उद्योग चालविताना येणाऱ्या अडचणींवरही त्यांनी प्रकाश टाकला.
सहकारमंत्री पाटील यांच्या भेटीप्रसंगी माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील-होटाळकर उपस्थित होते. कवळे गुरुजींच्या उद्यमशीलतेचे त्यांनी कौतुक केले. अध्यक्ष मारोतराव कवळे व मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कवळे यांनी त्यांचे स्वागत केले. उमरीचे माजी नगराध्यक्ष संजय कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. या कार्यक्रमास डॉ. विक्रम देशमुख तळेगावकर, प्रभाकर पुयड, भाजपचे बापूसाहेब कौडगावकर, ज्ञानेश्वर सावंत, किशोर पबितवार, गोविंदराव रामोड, पांडुरंगराव वाघलवाडेकर, उमरी, धर्माबाद तालुक्यातील सरपंच, विविध सेवा सहकारी सोसायट्यांचे चेअरमन, कार्यकर्ते उपस्थित होते.


















