नांदेड : दुष्काळी परिस्थिती, घटलेले पीक उत्पादन आणि वाढती महागाई यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी एमव्हीके उद्योग समूहाने विविध योजना जाहीर केल्या आहेत. यंदाच्या गाळप हंगामात सभासद ऊस उत्पादकांना जानेवारी ते मार्चदरम्यान टप्प्याटप्प्याने प्रतिटन ३५०० रुपये ऊसदर देण्याचे नियोजन असल्याची माहिती एमव्हीके उद्योग समूहाचे अध्यक्ष मारोतराव कवळे-गुरुजी यांनी दिली.
कुसूमनगर-वाघलवाडा येथील एमव्हीके अॅग्रो फूड प्रॉडक्ट लिमिटेडच्या २०२६-२७ गाळप हंगामाच्या पार्श्वभूमीवर सहाव्या बॉयलर अग्निप्रदीपन व गव्हाण पूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कवळे-गुरुजी बोलत होते. यंदा गाळप हंगामाच्या सुरुवातीला सभासद ऊस उत्पादकांना प्रतिटन ३१०० रुपये दर देण्यात येईल. त्यानंतर जानेवारी ते मार्च या कालावधीत टप्प्याटप्प्याने हा दर ३५०० रुपयांपर्यंत नेण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले. गतवर्षी याच कालावधीत कारखान्याने प्रतिटन ३००० रुपये दर दिला होता. यंदा त्यात वाढ करण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
साखरेबरोबर अन्य प्रकल्पांतून उत्पन्न वाढविणार
कमी पावसामुळे यंदा पिकांच्या वाढीवर परिणाम झाला असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे कारखाना केवळ साखर उत्पादनावर अवलंबून न राहता गुळाची पावडर, वीजनिर्मिती, इथेनॉल आणि सीबीजी प्रकल्पांच्या माध्यमातून उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत निर्माण करणार आहे. या माध्यमातून कारखान्याचे उत्पन्न वाढवून त्याचा फायदा ऊस उत्पादकांना देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे कवळे-गुरुजी यांनी सांगितले.
सभासदांना एकरी ५० हजारांपर्यंत कर्ज
सभासद शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रुपयांपर्यंत कर्ज तसेच खतांचा पुरवठा करण्याची योजना राबविण्यात येणार आहे. याशिवाय दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी १० लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. दहा महिन्यांच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने १० दुधाळ जनावरे उपलब्ध करून देण्याची योजनाही प्रस्तावित असल्याचे त्यांनी सांगितले. यंदा कारखान्याने ११ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. शेतकऱ्यांचा ऊस शिल्लक राहू नये, यासाठी आवश्यक नियोजन करण्यात येणार असून कारखाना पाच महिन्यांपेक्षा अधिक काळ सुरळीतपणे चालविण्यासाठी ऊस उत्पादकांनी सहकार्य करावे, असे आवाहन कवळे-गुरुजी यांनी केले.
चौथ्या कारखान्याचे ११ ऑक्टोबरला उद्घाटन
एमव्हीके उद्योग समूहाच्या चौथ्या कारखान्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रम ११ ऑक्टोबर २०२६ रोजी होणार असल्याची घोषणाही कवळे-गुरुजी यांनी केली. या कार्यक्रमाला विविध पदाधिकारी, शेतकरी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आनंदपुरी गुरु दत्तपुरी महाराज चोळाखेकर, आचार्य बामेराम बाबा कपाटे बिजेगाव आणि सिद्धोजात महाराज शिवाचार्य नागठाणेकर यांच्या शुभाशीर्वादाने हा कार्यक्रम पार पडला. धर्माबाद तालुक्यातील बाबळी येथील शेतीनिष्ठ शेतकरी मारोतराव शेषेराव कदम यांनी सहपत्नी बॉयलर पूजन केले. आम्रतराव शिवाजीराव डोईफोडे यांच्या हस्तेही पूजन करण्यात आले.


















