नांदेड : विभागातील साखर कारखान्यांकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची सुमारे २३० कोटींची ऊस बिले थकीत आहेत. अनेक साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना पूर्ण एफआरपी दिलेली नाही. आता खरीप हंगामाच्या तोंडावर पैसे नसल्याने ऊस उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. माजी मुख्यमंत्री, खासदार अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील भाऊराव चव्हाण कारखान्याकडे सर्वाधिक २२ कोटी रुपयांची उसबिले थकीत आहेत. या कारखान्यासह इतर सर्व कारखान्यांनी तातडीने ऊस बिले द्यावी आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
ऊस दर नियंत्रण मंडळाचे माजी सदस्य तथा शिवसेना प्रणित शेतकरी सेनेचे सरचिटणीस प्रल्हाद इंगोले आणि जिल्हाध्यक्ष माधव कदम यांनी या प्रश्नी आंदोलनाचा इशारा दिला आहे. केंद्र सरकारच्या कायद्यानुसार गाळप झाल्यानंतर पंधरा दिवसांत ऊस बिले देणे बंधनकारक असते. सद्यस्थितीत सहा महिन्यानंतरही शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नाहीत. कारखानदारांनी तातडीने शेतकऱ्यांना थकीत एफआरपी व्याजासह द्यावी, अशी मागणी इंगोले आणि कदम यांनी केली आहे. शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पैशांची गरज आहे. याशिवाय दैनंदिन व्यवहारासाठी शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत. त्यामुळे पैसे त्वरित मिळावेत अशी मागणी त्यांनी केली आहे. या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलनाचा इशारा शेतकरी सेनेने दिला आहे.


















