नाशिक : मी जेव्हा २००७ मध्ये कादवा सहकारी साखर कारखान्याची जबाबदारी स्वीकारली, त्यावेळी कारखाना आर्थिक संकटात होता. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी ठेवी देऊन पतसंस्था उभी केली आणि त्यातून कारखाना पुन्हा सुरू झाला. पहिल्या पंचवार्षिकमध्ये कारखान्याला आर्थिक स्थैर्य मिळाले. दुसऱ्या पंचवार्षिकमध्ये १२५० टीसीडी क्षमतेचे आधुनिकीकरण करून गाळप क्षमता २५०० टन करण्यात आली. तिसऱ्या पंचवार्षिकमध्ये इथेनॉल प्रकल्प सुरू करण्यात आला. आता कारखान्याचे २५०० वरून ३५०० टीसीडी गाळप क्षमतेपर्यंत विस्तारीकरण हाती घेतले आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी दिली. कारखान्याची ५५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखाना कार्यस्थळावर झाली. त्या वेळी ते बोलत होते.
यावेळी शेट्ये यांनी विस्तारीकरण झाल्यास गाळप क्षमता वाढण्याबरोबरच उत्पादन खर्चही कमी होण्यास मदत होणार आहे. शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून एकरी ऊस उत्पादन वाढविण्यावर भर द्यावा, असे आवाहन केले. विस्तारीकरणास ११७ कोटी रुपयांचा खर्च येणार असून हे काम अंतिम टप्प्यात आहे, असे ते म्हणाले. सभेत गणपतराव पाटील यांनी यंदा उशिरा गाळप सुरू करण्याचा ठराव मांडला. सभेत अधिकाधिक ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. मंत्री नरहरी झिरवाळ, खासदार भास्कर भगरे, माजी आमदार रामदास चारोस्कर, धनराज महाले, दत्तात्रेय पाटील, प्रवीण जाधव, प्रशांत कड, दत्तू भेरे, कमलेश बोडके, सुनील पाटील, शिवाजीराव बस्ते आदी उपस्थित होते. शहाजी सोमवंशी यांनी स्वागत केले. संचालक सुखदेव जाधव यांनी आभार मानले.


















