नाशिक : नाशिक सहकारी साखर कारखान्याकडे (नासाका) शेतकऱ्यांची ऊसबिले, कामगारांची देणी आणि इतर मिळून सुमारे १७ कोटी रुपयांची थकबाकी प्रलंबित आहे. कारखाना चालविण्याची जबाबदारी घेतलेल्या राजगंगा शुगर मिल्सने थकीत देणी न देता कारखाना बंद केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या प्रकरणाची चौकशी करून शेतकऱ्यांना त्यांचे पैसे मिळवून द्यावेत, अशी मागणी साखर आयुक्तांकडे करण्यात आली आहे.
दैनिक ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तात म्हटले आहे कि, ‘नासाका’च्या शेतकऱ्यांनी शुक्रवारी (१६ ऑक्टोबर) राज्याचे साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांची भेट घेऊन यासंदर्भात निवेदन दिले. पळसे येथील नाशिक सहकारी साखर कारखान्याकडे ऊसबिले, कामगारांची देणी आणि इतर मिळून १७ कोटी रुपयांची थकबाकी असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
माजी खासदार हेमंत गोडसे यांनी कारखाना चालविण्याची जबाबदारी घेतली होती, त्या काळात शेतकऱ्यांना उसाचे पैसे वेळेत मिळत होते. मात्र, अष्टलक्ष्मी इथेनॉल एनर्जी लिमिटेड आणि राजगंगा शुगर मिल्स प्रायव्हेट लिमिटेड, पुणे यांच्यात करार झाल्यानंतर कारखान्याचे सर्व अधिकार राजगंगा शुगर मिल्सचे संचालक राजाराम घावटे, प्रसाद घावटे आणि विठ्ठल कदम यांच्याकडे देण्यात आल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
२०२५-२६ च्या गाळप हंगामातील संपूर्ण देयकांची जबाबदारी राजगंगा शुगर मिल्सने घेतली होती. मात्र, कारखान्यातील साखर, भुसा आणि राख यांची विक्री करून कारखाना बंद करण्यात आला. त्यानंतर शेतकऱ्यांची थकीत ऊसबिले अदा न करता संबंधित कंपनीने माघार घेतल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. राजगंगा शुगर मिल्सने राज्यातील अन्य साखर कारखाने चालविण्याची जबाबदारीही घेतल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. त्यामुळे कंपनीच्या कामकाजाची चौकशी करून नासाकाच्या शेतकऱ्यांना त्यांची थकीत रक्कम मिळवून द्यावी, अशी मागणी त्यांनी साखर आयुक्तांकडे केली.
या वेळी स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अनिल ढिकले, शेतकरी संघटनेचे शंकरराव ढिकले, नाशिक तालुका खरेदी-विक्री संघाचे सभापती जयराम ढिकले आणि माजी सभापती दत्ता ढिकले आदी उपस्थित होते.
धाराशिवमधील कारखान्यांच्या व्यवहारांचीही चौकशी करण्याची मागणी
‘नासाका’ चालविण्याची जबाबदारी घेतलेल्या राजाराम घावटे, प्रसाद घावटे आणि विठ्ठल कदम यांच्या भूमिकेची चौकशी करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. उपलब्ध कागदपत्रे आणि पुराव्यांच्या आधारे संबंधितांची जबाबदारी निश्चित करावी. तसेच, अनियमितता किंवा कायद्याचे उल्लंघन आढळल्यास कठोर कायदेशीर कारवाई करावी, असे निवेदनात म्हटले आहे. याशिवाय, संबंधित व्यक्तींनी धाराशिव जिल्ह्यातील बानगंगा सहकारी साखर कारखाना आणि भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखाना चालविण्यास घेतल्याची माहिती मिळत असल्याने, या कारखान्यांशी संबंधित व्यवहारांचीही चौकशी करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.


















