नाशिक: नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा आणि अत्यंत महत्त्वाचा असलेला ऊस बिलांचा प्रश्न नवनिर्वाचित आमदार गोकुळ गीते यांनी विधानसभेत उपस्थित केला. आपल्या पहिल्याच अधिवेशनात त्यांनी नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथील ‘केजीएस साखर’ कारखान्याकडे थकीत असलेल्या ऊस बिलांकडे सरकारचे लक्ष वेधले. त्यावर शेतकऱ्यांना त्वरित थकबाकी दिली जाईल, असे आश्वासन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिले. विधान परिषदेत बोलताना आमदार गोकूळ गीते म्हणाले की, नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील मौजे पिंपळगाव निपाणी येथील केजीएस साखर कारखान्याकडे सन २०१८-१९ या गळीत हंगामातील १३० ऊस उत्पादक शेतकऱ्यांची साधारण दीड कोटी रुपयांची ऊस बिले अद्यापही प्रलंबित आहेत.
हक्काचे पैसे न मिळाल्यामुळे येथील शेतकरी अत्यंत गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. राष्ट्रीय साखर लवादाच्या आदेशानुसार २०२५ मध्ये ‘ग्रेनेंच कंपनी लासलगाव’ यांनी हा कारखाना विकत घेतला आहे. मात्र, लवादाच्या आदेशानंतरही साखर कारखाना प्रशासनाने या शेतकऱ्यांचे पेमेंट दिलेले नाही. त्यामुळे सहकार मंत्र्यांनी साखर आयुक्तांमार्फत या साखर कारखान्याला तात्काळ आदेश द्यावेत, अशी मागणी आमदार गीते यांनी केली. या प्रश्नावर उत्तर देताना सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितले की, शेतकऱ्यांची थकबाकी देण्याबाबत सरकार सकारात्मक असून यावर नक्कीच कारवाई केली जाईल. थकीत एफआरपीची रक्कम व्याजासह वसूल करण्याचे आदेश देण्यात आले असून आरआरसीद्वारे ही रक्कम वसूल करण्याची प्रक्रिया केली जात आहे.


















