राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे राष्ट्रीय पुरस्कार जाहीर; राज्यातील भिमाशंकर, क्रांतीअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड हे दोन कारखाने ठरले देशात सर्वोत्कृष्ठ

नवी दिल्ली : राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघातर्फे २०२४-२५ आणि २०२५-२६ या दोन वर्षांसाठी जाहीर करण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राने दमदार कामगिरी करत देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. दोन्ही वर्षांतील एकूण ५७ पुरस्कारांपैकी तब्बल २१ पुरस्कार महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांनी मिळवले आहेत. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघामध्ये देशातील २६० सहकारी साखर कारखाने आणि ९ राज्यस्तरीय साखर महासंघांचा समावेश आहे. कारखान्यांची कार्यक्षमता, ऊस विकास, तांत्रिक कार्यक्षमता, आर्थिक व्यवस्थापन, साखर उतारा, सहकारी व्यवस्थापन आणि सामाजिक उत्तरदायित्व यांसारख्या विविध निकषांवर पुरस्कारांसाठी कारखान्यांची निवड करण्यात आली.

२०२४-२५ मध्ये ऊस विकासाच्या उच्च साखर उतारा गटात श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना, कोल्हापूर याला प्रथम क्रमांक मिळाला. तांत्रिक कार्यक्षमतेत यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना, सातारा प्रथम ठरला. आर्थिक व्यवस्थापनात विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना, सोलापूर याला तृतीय क्रमांक मिळाला, तर सर्वाधिक साखर उताऱ्यासाठी भोगावती सहकारी साखर कारखाना, कोल्हापूर याची निवड झाली. याच वर्षी सर्वोत्तम सहकारी साखर कारखाना या उच्च उतारा गटातील पुरस्कारासाठी छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना, कागल (कोल्हापूर) याची निवड झाली.

ChiniMandi WhatsApp Channel

२०२५-२६ या वर्षातही महाराष्ट्रातील कारखान्यांनी विविध विभागांत पुरस्कार पटकावले. ऊस विकासाच्या उच्च उतारा गटात सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखाना, सोलापूर याला तृतीय क्रमांक मिळाला. तांत्रिक कार्यक्षमतेत निरा-भीमा सहकारी साखर कारखाना, पुणे प्रथम, तर विलास सहकारी साखर कारखाना, लातूर द्वितीय आणि श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना, पुणे तृतीय ठरला. सर्वाधिक साखर उतारा या विभागात अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना, सातारा याला पुरस्कार मिळाला. सामाजिक उत्तरदायित्व (CSR) विभागात राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना, सांगली विजेता ठरला. सर्वोत्तम सहकारी साखर कारखाना या विभागात कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना, सोलापूर याची निवड करण्यात आली.

…हे दोन कारखाने ठरले देशात सर्वोत्कृष्ट

२०२४-२५ चा राष्ट्रीय स्तरावरील वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्कार भिमाशंकर सहकारी साखर कारखाना, पुणे याला मिळाला.

२०२५-२६ चा राष्ट्रीय स्तरावरील वसंतदादा पाटील पुरस्कार सांगली जिल्ह्यातील क्रांतीअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना याला मिळाला.

महाराष्ट्रानंतर उत्तर प्रदेश, गुजरात

दोन्ही वर्षांतील पुरस्कारांचा विचार करता महाराष्ट्र २१ पुरस्कारांसह देशात पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर उत्तर प्रदेश आणि गुजरातला प्रत्येकी ८ पुरस्कार, पंजाब आणि तमिळनाडूला प्रत्येकी ५, हरियाणाला ३, कर्नाटक व छत्तीसगडला प्रत्येकी २, तर मध्य प्रदेश, ओडिशा आणि दिल्लीला प्रत्येकी १ पुरस्कार मिळाला आहे.

२२ सप्टेंबरला पुरस्कार वितरण

या राष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण २२ सप्टेंबर २०२६ रोजी नवी दिल्ली येथे होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असून, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह विविध राज्यांतील मंत्री आणि साखर उद्योगातील अधिकारी उपस्थित राहणार आहेत. साखर उद्योगातील संशोधन आणि सहकार क्षेत्रातील योगदानासाठी यंदा विशेष पुरस्कारांचीही घोषणा करण्यात आली आहे. तसेच महासंघाकडून ऊस उत्पादकता वाढविणे, पाणी व्यवस्थापन, कृत्रिम बुद्धिमत्ता, अचूक शेती, डिजिटल तंत्रज्ञान आणि स्वयंचलित तंत्रज्ञानाच्या वापरावरही भर देण्यात येत आहे.

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे कार्य

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ ही भारतातील सहकारी साखर कारखान्यांची शिखर संस्था आहे. या संस्थेच्या अंतर्गत २६० सहकारी साखर कारखाने व ९ राज्यस्तरीय साखर संघाचा समावेश होतो. या संस्थेचा मुळ उद्देश हा देशात सहकारी साखर कारखान्यांची गुणवत्ता, विकास व वाढ उत्कृष्ट प्रकल्प व्यवस्थापन, ऊस पिकाचे नियोजन व व्यवस्थापन, अत्युच्च साखर अभियांत्रिकी तंत्रज्ञान, आर्थिक व्यवस्थापन, मनुष्यबळ व्यवस्थापन तसेच केंद्र शासनाशी व विविध राज्य शासनातील सरकारी खाते व महामंडळाशी संपर्क ठेवून सहकारी साखर कारखान्यांशी निगडीत धोरण ठरविणेत महत्वाची भुमिका बजावते.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here