साखरेची एमएसपी ४१ रुपये करण्याची राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाची मागणी

नवी दिल्ली : देशात ऊस लागवडीखालील क्षेत्रात ७.३६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. एकूण उत्पादन पाच हजार लाख टनांपेक्षा अधिक असून केवळ २,९७५ लाख टन उसाचे गाळप होईल. हे प्रमाण उत्पादनाच्या ६० टक्क्यांपेक्षा कमी आहे. पश्चिम आशियातील युद्ध आणि सागरी वाहतुकीतील अडथळे यामुळे साखरेच्या निर्यातीवरही परिणाम झाला आहे. २० लाख टन साखर निर्यातीचा कोटा असताना प्रत्यक्षात केवळ प्रत्यक्षात केवळ सुमारे सात लाख निर्यातीचे करार झाले आहेत. त्यामुळे आर्थिक तणावाखाली असलेल्या साखर उद्योगाला पाठबळ देण्यासाठी केंद्र सरकारने साखरेचा किमान विक्री दर (एमएसपी) ४१ रुपये प्रतिकिलो करावा, अशी मागणी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे.

दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत हर्षवर्धन पाटील यांनी साखरेचा पुरवठा स्थिर असला तरी, साखर उद्योगाचे आर्थिक आरोग्य संकटात असल्याकडे लक्ष वेधले. ते म्हणाले की, साखर उद्योगाला सरकारच्या धोरणात्मक पाठिंब्याची आवश्यकता आहे. केंद्र सरकारने साखरेचे किमान विक्री किंमत (एमएसपी) ४१ रुपये प्रति किलो करावे. साखर उद्योगासाठी इथेनॉलचा कोटा ५० टक्क्यांपर्यंत करावा त्याचप्रमाणे साखर विकास निधीच्या ओटीएस योजनेमध्ये कारखान्यांना दंडात्मक व्याजात ५० टक्क्यांची सूट मिळावी. खर्च आणि मिळकत यातील तफावत भरून काढण्यासाठी एमएसपी वाढीची गरज आहे. तसेच इथेनॉलची दरवाढ आणि साखर उद्योगासाठी इथेनॉल उत्पादनाचा कोटा वाढविणेही गरजेचे आहे. साखर विकास निधी अंतर्गत कारखान्यांची एक रकमी तडजोड (ओटीएस) योजनेत सुधारणेचीही आवश्यकता आहे. पत्रकार परिषदेला महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here