पुणे : ऊस उत्पादक शेतकरी, ऊसतोड कामगार, कारखाना कामगार तसेच पुरवठादार, या सर्व घटकांना केंद्रस्थानी ठेवून प्रभावी व्यवस्थापन आणि दूरदृष्टीच्या जोरावर ओंकार शुगर ग्रुपने महाराष्ट्राच्या साखर उद्योगात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे, असे गौरवोद्रार केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले. ओंकार साखर कारखाना प्रा. लि.च्या नवीन मुख्य कार्यालयाचा उद्घाटन समारंभ रविवार, दि. २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता ओंकार ग्रुपच्या पुणे येथील कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात झाला. या नवीन मुख्य कार्यालयाचे उद्घाटन केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते झाले.
बंद पडलेल्या साखर कारखान्यांना पुन्हा उभारी : मंत्री मोहोळ
मंत्री मोहोळ म्हणाले की, राज्यातील बंद पडलेल्या साखर कारखान्यांना पुन्हा उभारी देऊन त्यांचे कामकाज सुरू करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य ओंकार शुगर ग्रुपने केले आहे. त्यामुळे विविध भार्गातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, संबंधित परिसरात रोजगाराच्या संधीही निर्माण झाल्या आहेत. शेतकरी, कामगार आणि कारखान्याशी निगडित विविध घटकांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यात ग्रुपचे योगदान महत्त्वपूर्ण ठरत आहे.
बाबूराव बोत्रे-पाटील यांच्यामुळे साखर कारखानदारीला बळ : जयंत पाटील
शेकापचे नेते व माजी आमदार जयंत पाटील म्हणाले की, सहकारी साखर उद्योगातील काही ठिकाणी शिस्तीचा अभाव आणि हितसंबंधांचे राजकारण यामुळे अनेक कारखाने अडचणीत आले. मात्र, ओंकार शुगर ग्रुपने कमी मनुष्यबळात अधिक उत्पादन, खर्चात बचत आणि कार्यक्षम व्यवस्थापन या तत्त्वांवर भर दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव देणे शक्य होत आहे. बाबूराव बोत्रे-पाटील यांनी राज्यातील अनेक बंद पडलेले कारखाने यशस्वीपणे चालवून दाखविल्याचेही त्यांनी सांगितले.
ओंकार शुगर ग्रुपतर्फे शेतकरीहिताला सर्वोच्च प्राधान्य : अध्यक्ष बाबूराव बोत्रे-पाटील
ओंकार शुगर ग्रुपचे अध्यक्ष बाबूराव बोत्रे-पाटील म्हणाले की, साखरेच्या बाजारभावात वाढ होत असल्याने त्याचा लाभ ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणे अपेक्षित आहे. यंदाच्या गळीत हंगामातही ओंकार ग्रुपच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उसाला चांगला बाजारभाव देण्याचा प्रयत्न राहणार आहे. राज्यात आत्तापर्यंत बंद पडलेले सुमारे २३ साखर कारखाने पुन्हा सुरू करण्यात ओंकार ग्रुपला यश आले आहे.
साखर उद्योगाला चालना देण्याचा प्रामाणिक प्रयत्न
ते म्हणाले, बंद कारखान्यांना नवसंजीवनी देतानाच शेतकरीहिताला प्राधान्य देण्याची भूमिका ग्रुपने कायम ठेवली आहे. अनेकदा सर्वप्रथम उसाचा बाजारभाव जाहीर करून इतर कारखान्यांसाठी दिशादर्शक भूमिका घेण्यात आली. त्याचा परिसरातील ऊस उत्पादकांना चांगला दर मिळण्यास फायदा झाला तसेच शेतकऱ्यांना मोफत साखर देण्याचा उपक्रम राबवून शेतकरी वर्गात विश्वासाचे नाते निर्माण करण्यात आले आहे. ओंकार ग्रुपच्या कार्यपद्धतीमुळे शेतकरी आणि कामगारांचा ग्रुपवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे. बंद कारखाने सुरू करून साखर उद्योगाला चालना देतानाच संबंधित मागाच्या आर्थिक विकासालाही हातभार लावण्याचे काम ग्रुपकडून सुरू आहे.
यावेळी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, साखर आयुक्त डॉ. संजय कोलते, ओंकार शुगर ग्रुपचे अध्यक्ष बाबूराव बोत्रे पाटील, संचालक प्रशांत बोत्रे पाटील, ओमराजे बोत्रे-पाटील, रेखा बोत्रे-पाटील, डॉ. गौरी बोत्रे-पाटील, उद्योजक प्रवीण बडेकर, घोडगंगा साखर कारखान्याचे माजी संचालक दिलीप मोकाशी, अशोक नागरी बँकेचे अध्यक्ष प्रकाश मथुरिया, उपाध्यक्ष यामिनी पाटील यांच्यासह कारखान्याचे कर्मचारी, ऊस उत्पादक शेतकरी व विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

















