मुंबई : महाराष्ट्रात खरीप हंगामातील पेरणीला आता वेग येऊ लागला असला, तरी ती अद्याप गेल्या वर्षाच्या तुलनेत लक्षणीयरीत्या मागे आहे. राज्य सरकारच्या आकडेवारीनुसार, 13 जुलैपर्यंत ऊस वगळता खरीप पिकांची पेरणी 86.92 लाख हेक्टर क्षेत्रावर झाली असून, हे राज्याच्या सरासरी खरीप लागवड क्षेत्राच्या 60 टक्के इतके आहे. मात्र, गेल्या वर्षी याच कालावधीत 120.65 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली होती, जी सरासरी क्षेत्राच्या 84 टक्के होती. त्यामुळे यंदा पेरणीचा वेग मागील वर्षाच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात मंदावल्याचे दिसून येत आहे.
राज्य सरकारच्या प्राथमिक पाहणीनुसार, जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पाऊस, जोरदार वारे आणि गारपिटीमुळे कृषी व फलोत्पादन पिकांच्या 6,673 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. राज्य सरकारच्या माहितीनुसार, अनेक जिल्ह्यांमध्ये आता पेरणीला गती मिळत आहे. अतिवृष्टीचा फटका बसलेल्या भागांमध्ये शेतकरी भाताची पुनर्लागवड करत आहेत. तर यापूर्वी पेरणी झालेल्या पिकांमध्ये सध्या उगवण आणि रोपांच्या प्रारंभिक वाढीचा टप्पा सुरू आहे.
देशभरातही यंदा खरीप पेरणीचा वेग गेल्या वर्षाच्या तुलनेत कमी राहिला आहे. दक्षिण-पश्चिम मान्सूनचा कमकुवत प्रभाव आणि एल निनोच्या परिणामामुळे जून महिन्यात अपेक्षेपेक्षा कमी पाऊस झाल्याने खरीप हंगामावर परिणाम झाला आहे.केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 10 जुलैपर्यंत देशभरात 531.25 लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी झाली होती. गेल्या वर्षी याच कालावधीत हा आकडा 632.69 लाख हेक्टर होता. म्हणजेच यंदा पेरणीत 16 टक्क्यांची घट नोंदवली गेली आहे.
प्रमुख पिकांमध्ये भाताचे क्षेत्र 114.69 लाख हेक्टर इतके राहिले असून, गेल्या वर्षी ते 125.53 लाख हेक्टर होते. तेलबिया पिकांचे क्षेत्रही घटून 117.83 लाख हेक्टर झाले आहे. मागील वर्षी हे क्षेत्र 149.18 लाख हेक्टर होते. तेलबियांमध्ये सोयाबीन पेरणीत सर्वाधिक घट झाली आहे. यंदा 90.51 लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली असून, गेल्या वर्षी याच कालावधीत ती 107.72 लाख हेक्टर होती. याउलट, ऊस लागवडीत किंचित वाढ झाली आहे. यंदा ऊसाचे क्षेत्र 57.58 लाख हेक्टर असून, गेल्या वर्षी ते 56.72 लाख हेक्टर होते. तसेच ताग आणि मेस्ता पिकांचे क्षेत्रही वाढून 6.28 लाख हेक्टर झाले आहे.दरम्यान, कापूस पेरणीही गेल्या वर्षाच्या तुलनेत मागे आहे. यंदा 79.54 लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची पेरणी झाली असून, मागील खरीप हंगामातील याच कालावधीत ती 93.95 लाख हेक्टर होती.


















