सांगली : हुतात्मा साखर कारखाना वाचवण्यासाठी आम्ही सनदशीर मार्गाने आंदोलन करत आहोत. कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी पोलिसांच्या आडून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करु नये, असे आवाहन ज्येष्ठ नेते किरण नायकवडी यांनी येथे केले. वैभव नायकवडी यांनी कारखान्याच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा आणि कारखान्याचे कर्ज स्वतः फेडावे या मागणीसाठी ३७ दिवसांपासून किरण नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन सुरू आहे. सोमवारी आंदोलनाच्या ठिकाणी लावलेल्या ध्वनी यंत्रणेला आष्टा पोलिसांनी मज्जाव केल्यामुळे आंदोलनस्थळी शांतता होती.
किरण नायकवडी म्हणाले, आम्ही अजूनही कायद्याच्या चौकटीत राहून आंदोलन करत आहोत. मात्र त्याचा गैरअर्थ काढू नका. दांडके हातात घेऊन लढण्याची तयारी आमची आहे. शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाला दडपण्याचा प्रयत्न करू नका. वैभव नायकवडी यांचा राजीनामा घेतल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही. सगळ्या सभासदांच्या नजरेतून वैभव नायकवडी उतरले आहेत. कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करताना वैभव नायकवडी यांनी कशाची फिकीर केली नाही. आता सगळे अंगाशी आल्याने ते सैरभैर झाले आहेत. गौरव नायकवडी म्हणाले, आवाज दाबण्याचा प्रयत्न म्हणजे पोरकटपणा आहे. केदार नायकवडी म्हणाले, वैभव नायकवडी यांना सगळ्या संस्थांच्या कामकाजातून बाजूला काढले जाईल.


















