पाकिस्तान : साखर कारखान्यांची अतिरिक्त ४ लाख टन साखर निर्यातीची मागणी; अतिरिक्त साठ्यामुळे उद्योगासमोर आर्थिक संकट

इस्लामाबाद : पाकिस्तान शुगर मिल्स असोसिएशनने (PSMA) सरकारकडे अतिरिक्त ४ लाख मेट्रिक टन साखर निर्यातीला परवानगी देण्याची आणि दीर्घकाळ प्रलंबित असलेले साखर उद्योगाचे नियंत्रणमुक्ती धोरण (डीरेग्युलेशन पॉलिसी) जाहीर करण्याची मागणी केली आहे. देशात विक्री न झालेल्या साखरेचा साठा वाढत असल्याने डिसेंबरपूर्वी २०२६-२७ चा ऊस गाळप हंगाम सुरू करणे कारखान्यांना कठीण होऊ शकते, असा इशाराही संघटनेने दिला आहे. बिझनेस रेकॉर्डरने याबाबत वृत्त दिले आहे. बुधवारी लाहोर, कराची आणि इस्लामाबाद येथे एकाच वेळी आयोजित करण्यात आलेल्या संघटनेच्या सर्वसाधारण सभेत ही मागणी करण्यात आली. या बैठकीला पंजाब, सिंध आणि खैबर पख्तूनख्वा प्रांतांतील साखर कारखाना मालक उपस्थित होते.

PSMA च्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, सरकारने २ लाख मेट्रिक टन साखर निर्यातीला परवानगी दिली असतानाही पाकिस्तानमध्ये सुमारे ११ लाख मेट्रिक टन अतिरिक्त साखरेचा साठा शिल्लक आहे. या साठ्यामुळे कारखान्यांची आर्थिक कोंडी झाली असून, आगामी गाळप हंगाम सुरू होण्यास विलंब होण्याची शक्यता कारखानदारांनी व्यक्त केली आहे. बैठकीत संघटनेच्या कार्यकारी समितीला अतिरिक्त साखर निर्यातीसाठी सरकारची मंजुरी मिळवण्याचे तसेच सर्वसमावेशक नियंत्रणमुक्ती धोरण जाहीर करण्यासाठी पाठपुरावा करण्याचे अधिकार देण्यात आले. २०२६-२७ च्या गाळप हंगामाच्या अखेरीस साखरेचा आणखी मोठा अतिरिक्त साठा निर्माण होण्याची शक्यता असल्याचा इशाराही बैठकीत देण्यात आला. सरकारने वेळेत धोरणात्मक निर्णय घेतले नाहीत, तर साखर उद्योगाची आर्थिक परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते, असे संघटनेने स्पष्ट केले.

ChiniMandi WhatsApp Channel

१६ नोव्हेंबरला लाहोरमध्ये पत्रकार परिषद

संघटनेने १६ नोव्हेंबर रोजी लाहोर येथे पत्रकार परिषद घेऊन पुढील कृती आराखडा जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच साखर उद्योगासमोरील अडचणी आणि त्यावरील संभाव्य उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी उपपंतप्रधानांची भेट मिळावी, अशी विनंती करणारे पत्र त्यांना पाठवण्याचा प्रस्तावही बैठकीत मांडण्यात आला. अतिरिक्त साखर साठ्याची विल्हेवाट लावण्यासाठी निर्यातीला परवानगी आणि स्पष्ट धोरणात्मक निर्णय आवश्यक असल्याचे साखर कारखानदारांचे म्हणणे आहे. त्यामुळे सरकार याबाबत काय निर्णय घेते, याकडे पाकिस्तानमधील साखर उद्योगाचे लक्ष लागले आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here