परभणी : भारतीय कृषी अनुसंधान परिषद (नवी दिल्ली) पुरस्कृत व जीवन ज्योत चॅरिटेबल ट्रस्ट संचालित, कृषी विज्ञान केंद्र (परभणी) यांच्या वतीने वडगाव (सुके) येथे बुधवारी विशेष प्रशिक्षण आणि निविष्ठा वाटप कार्यक्रम पार पडला. केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. प्रशांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम घेण्यात आला. ऊस पिकातील हुमणी अळीच्या नियंत्रणासाठी किडींना रोगकारक सूत्रकृमीच्या परिणामकारकतेचे मूल्यांकन’ ही पीक प्रक्षेत्र चाचणी कृषी विज्ञान केंद्रामार्फत राबवली जात आहे.
याप्रसंगी विषय विशेषज्ञ (पीक संरक्षण) डॉ. अमोल काकडे यांनी शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, ‘हेटरोरॅबडस इंडिका’ हे मातीत राहणारे सूक्ष्म व फायदेशीर कीटक-परजीवी नेमाटोड (सूत्रकृमी) आहेत. हे जंतू हुमणीसारख्या नुकसानकारक कीटकांच्या अळ्यांच्या शरीरात तोंडाद्वारे किंवा श्वासोच्छवासाच्या छिद्रातून प्रवेश करतात आणि ‘फोटोरॅबडस’ नावाचे विषारी जिवाणू सोडतात. यामुळे अवघ्या ४८ तासांत कीटक मरून जातो. हे तंत्रज्ञान मानवी आरोग्य आणि पिकांसाठी पूर्णपणे सुरक्षित आहे. उपस्थित शेतकऱ्यांना या रोगकारक सूत्रकृमीचे मोफत वाटप करण्यात आले.


















