जमिनीच्या पूर्वमशागतीमुळे ऊस पिकातील तण, कीड, रोगांचा प्रादुर्भाव होतो कमी : कृषी तज्ज्ञांचे मत

कोल्हापूर : ऊस पिकाच्या अधिक उत्पादनासाठी जमिनीची पूर्वमशागत अत्यंत महत्त्वाची मानली जाते. शेतकऱ्यांनी माती परीक्षणाच्या आधारे खत व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. एकात्मिक पद्धतीने सेंद्रिय, रासायनिक व जैविक घटकांचा समावेश करून अन्नद्रव्ये व्यवस्थापन करावे. शेतातील पाण्याच्या योग्य निचरा होण्याची व्यवस्था करावी आणि जमीन समतल करून सऱ्या योग्य अंतरावर काढाव्यात. या पिकामध्ये योग्यवेळी व योग्यप्रकारे पूर्व मशागत केल्यास जमिनीची सुपीकता टिकून राहते व पिकाची वाढ जोमदार होत मदत होते. मशागतीमुळे तण, कीड व रोगांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते, असा सल्ला पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधील तज्ज्ञ प्रणाली ढकाणे, डॉ. अभिनंदन पाटील आणि डॉ. अशोक कडलग यांनी दिला आहे. यासोबतच सेंद्रिय खताचे जमिनीत योग्य प्रकारे मिश्रण केल्यास पिकाला आवश्यक पोषकद्रव्यांचा पुरवठा सुधारतो. परिणामतः ऊस पिकाची वाढ जोमदार होते, उत्पादनात वाढ होते आणि उसाची गुणवत्ता अधिक चांगली मिळण्यास मदत होते. उसाचे सुरुवातीच्या काळात व्यवस्थापन करणे अत्यंत गरजेचे आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

कृषी तज्ज्ञांनी सांगितले की, ऊस लागवडीसाठी मध्यम ते भारी, खोल, सपाट व पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या जमिनीची निवड करावी. मध्यम काळी, गाळाची किंवा चांगली संरचना असलेली जमीन उसासाठी अधिक उपयुक्त मानली जाते. योग्य जमिनीच्या निवडीमुळे मुळांची वाढ चांगला होतो. जमिनीची ३० ते ४५ सेंमी खोलपर्यंत खोल नांगरणी करावी. माती भुसभुशीत होते तसेच जमिनीत हवा खेळती राहते. परिणामी, मुळांना खोलवर वाढण्यासाठी पोषक वातावरण मिळते. जमिनीतील पाणी व हवा यांचे योग्य संतुलन राखले जाते. त्यामुळे पाण्याचा कार्यक्षम वापर होतो व पिकास पाण्याचा ताण कमी सहन करावा लागतो. पूर्वमशागतीच्या वेळी हिरवळीचे खत जमिनीत मिसळल्याने सेंद्रिय पदार्थ व नत्राचे प्रमाण वाढते. त्यामुळे जमिनीची संरचना सुधारते, अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते. शेतकऱ्यांनी शेणखत व इतर सेंद्रिय खतांचे जमिनीत योग्य मिश्रण केल्याने अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते व खतांचा वापर अधिक प्रभावीपणे होतो. योग्य पूर्वमशागत केल्याने सूर्यप्रकाशाच्या प्रभावामुळे जमिनीतील रोगकारक बुरशी, जिवाणू व किडींचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते. उसाची वाढ जोमदार होते, कांड्यांची संख्या व जाडी वाढते. परिणामी एकूण उत्पादन वाढण्यास मदत होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here