पुणे : पुरंदर तालुक्यातील काही भागात ऊस पिकांवर हुमणी अळीचा प्रादुर्भाव निर्माण झाला आहे. बदलत्या वातावरणामुळे मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यांत केलेली ऊस लागवड, आडसाली ऊस लागवडीवर याचा गंभीर परिणाम दिसून येत आहे. ऊन-पावसाचा खेळ, निर्माण झालेली उष्णता यामुळे हुमणीच्या वाढीला पोषक वातावरण निर्माण बनले होते. या अळ्या सध्या लागवडीच्या तसेच मागील वर्षी लागवड केलेल्या उसाच्या पांढऱ्या मुळ्यांना लक्ष करत आहेत. माळरानावर हुमणीला पोषक वातावरण निर्माण झाले. त्यामुळे शेतकरी दुहेरी आर्थिक संकटात सापडला आहे.
हुमणी अळी ऊस, मका, सोयाबीन, भुईमूग आदी पिकांच्या मुळांना खाते. आता पिके वाळू लागली असून शेतकऱ्यांना पुन्हा लागवड करावी लागणार आहे. याबाबत शेतकरी सुशांत भुजबळ यांनी सांगितले की, वाल्हे परिसरात हुमणीचा प्रादुर्भाव मागील काही वर्षांपासून वाढत असून, पिकांचे ३० ते ८० टक्के नुकसान होत आहे. आता दुबार लागणीमुळे शेतकऱ्यांना बियाणे, खत, मजुरी, पाण्याचा अतिरिक्त खर्च सहन करावा लागत आहे. त्यामुळे आर्थिक संकट वाढले आहे. पावसाची अनियमितता, वाढती उष्णता यांचा हा परिणाम होत असून, अशा स्थितीत जोरदार पावसाची प्रतीक्षा करणे हा एकच उपाय शेतकऱ्यांच्या हाती राहिला आहे. प्रादुर्भाव रोखण्यासाठी आळवणीचा खर्च मोठा असल्याने अनेक शेतकरीवर्ग याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे उभी पिके वाळून जात आहेत. उष्णतेमुळे पोषक वातावरण वाढत चालल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.


















