पुणे : शिरूर तालुक्याचा पूर्व भाग हा प्रामुख्याने ऊस शेतीसाठी प्रसिद्ध आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात उसाचे उत्पादन होत असल्याने येथे वर्षभर ऊसतोड सुरू असते. प्रामुख्याने दौंड व शिरूर तालुक्यांतील अनेक गुऱ्हाळ व्यावसायिक हे शेतकऱ्यांचा ऊस घेऊन जातात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून येथे पिकअप व टेम्पोवर कामगारांना बसवून धोकादायक पद्धतीने वाहतूक केली जाते. बांधकाम ठेकेदार व गुऱ्हाळ व्यावसायिकांकडून चारचाकी वाहनातून दररोज कामगारांची धोकादायक पद्धतीने अवैध वाहतूक केली जात आहे. यात गंभीर अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान असे प्रकार आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा शिरुर पोलिस स्थानकाचे निरीक्षक विनोद पाटील यांनी दिला आहे.
शिरूर चौफुला राष्ट्रीय महामार्ग तसेच मांडवगण फराटा व वडगाव रासाई, तांदळी परिसरात अशा धोकादायक पद्धतीने कामगारांना वाहनांच्या टपावर बसवले जात आहे. एकाच वाहनात दाटीवाटीने ऊसतोड करणाऱ्या कामगारांना बसवून ऊसतोड सुरू असलेल्या ठिकाणी सकाळी सोडले जाते. सायंकाळी ऊसतोड संपल्यानंतर पुन्हा त्याच वाहनातून परत नेले जाते. यात पिकअप टेम्पोच्या टपावर बसून वाहतूक केले जाते. या टपावर बसणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने लहान व अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. तसेच ही वाहने चालवणारे अनेक चालक याच कामगारांमधील असल्याने त्यांच्याकडे वैध वाहन चालक परवाना नसतो. कामगारांचा जीव धोक्यात घालून धोकादायक पद्धतीने वाहतूक करणाऱ्या गुऱ्हाळ व्यावसायिकांवर पोलिस प्रशासनाने त्वरित कारवाईची मागणी केली जात आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते प्रवीण फराटे म्हणाले की, आंधळगाव येथील सीएनजी पंपासमोर पिकअप वाहनातून धोकादायक पद्धतीने प्रवास करत असताना झालेल्या अपघातात तीन ऊसतोड कामगारांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतरही परिसरात क्षमतेपेक्षा अधिक कामगारांना पिकअप व टेम्पोमधून वाहतूक करण्याचे प्रकार सुरूच आहे. अशा वाहतुकीवर तातडीने नियंत्रण आणावे.


















