पुणे : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत एकाच जागेवर शेकडो इच्छुक उमेदवार

पुणे : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी निवडणूक कार्यालयाने बुधवारी अंतिम यादी प्रसिद्ध केली असून, ५१४ जणांचे उमेदवारी अर्ज पात्र ठरले आहेत. विशेष म्हणजे, मांडकी-जवळार्जुन गटातून सर्वाधिक इच्छुक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सर्वसाधारण प्रतिनिधी मतदारसंघातील पंधरा जागांसाठी, पाच गटांत प्रत्येकी तीन जागा असून, सर्वाधिक जागांसाठी ३३५ अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे या मतदारसंघातील उमेदवारांची संख्या कमी करण्याचे आव्हानही प्रमुख नेत्यांसमोर आहे. अंतिम यादी जाहीर झाली असली तरी माघारीनंतरच निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे. पॅनेलनिहाय उमेदवार निश्चित करताना बंडखोरी रोखणे, नाराजांची मनधरणी आणि प्रत्येक गटातील मतांचे गणित जुळवण्यासाठी नेत्यांना धावपळ करावी लागणार आहे.

कारखान्याची वार्षिक सभा २१ सप्टेंबर रोजी होणार आहे. त्यानंतर सर्व पॅनेलकडून अंतिम उमेदवारांची घोषणा होईल. उमेदवारांची संख्या मोठी असल्याने आता राजकीय पक्ष आणि स्थानिक नेत्यांची खरी कसोटी लागणार आहे. प्रत्येक गटातून अनेक इच्छुक असल्याने पॅनेलची अंतिम बांधणी करताना कोणाला संधी द्यायची आणि कोणाला थांबवायचे, यावर नेत्यांना निर्णय घ्यावा लागणार आहे. प्रत्येक पक्ष आणि गटासमोर इच्छुकांची संख्या कमी करून अंतिम पॅनेल उभे करण्याचे मोठे आव्हान आहे. शिवसेनेच्या सुमारे चाळीस उमेदवारांच्या मुलाखती सासवड येथे नुकत्याच झाल्या. बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शंभरपेक्षा अधिक इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. सत्ताधारी राष्ट्रवादीच्या मुलाखतीचीही उत्सुकता आहे. राष्ट्रवादीकडे सर्वाधिक सुमारे अडीचशे इच्छुक असल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे सव्वाशेच्या आसपास, तर भाजपकडे शंभरच्या आसपास अर्ज असल्याची चर्चा आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here