पुणे : ‘एफडीए’च्या सूचनांनंतर दौंडमधील गुऱ्हाळघरे पुन्हा सुरू; शेतकरी व गुऱ्हाळचालकांना दिलासा

पुणे : अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाकडून राज्यभर सुरू असलेल्या भेसळविरोधी मोहिमेच्या पार्श्वभूमीवर दौंड तालुक्यातील सुमारे ४०० गुऱ्हाळे काही दिवसांपूर्वी बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे शेतकऱ्यांचा तोडलेला ऊस गुन्हाळांवर पडून राहिला होता, तर अनेक ठिकाणी ऊस तोडणीही थांबली होती. मात्र, (एफडीए) अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनंतर गुरुवारी (दि. ११) सायंकाळपासून गुऱ्हाळे पुन्हा सुरू करण्यात आली असून, शेतकरी व गुऱ्हाळचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

पाटस येथील गुऱ्हाळ व्यावसायिकांनी पुणे येथील अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी कोणत्याही प्रकारचे रासायनिक पदार्थ, साखर, चॉकलेट पावडर किंवा इतर मेसळयुक्त घटक न वापरता पारंपरिक पद्धतीने शुद्ध गुळनिर्मिती करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर परिसरातील गुऱ्हाळे पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

ChiniMandi WhatsApp Channel

अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभर भेसळविरोधी कारवाईला वेग आला आहे. विविध ठिकाणी छापे टाकून कारवाई होत असल्याने दौंड तालुक्यातील गूळ उत्पादकांनीही सावध भूमिका घेतली होती. तालुक्याच्या इतिहासात प्रथमच मोठ्या प्रमाणावर गुऱ्हाळे एकाच वेळी बंद ठेवण्यात आल्याने गूळ उत्पादन प्रक्रियेत भेसळीच्या मुद्द्यावर व्यापक चर्चा रंगली होती. आता FDA च्या सूचनांनुसार शुद्ध आणि दर्जेदार गूळनिर्मितीवर भर देण्यात येणार असल्याचे गुन्हाळचालकांनी सांगितले.

गुऱ्हाळ व्यवसायातील भेसळीच्या मुद्द्यासोबतच प्रदूषणाचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे. काही गुऱ्हाळांमध्ये जाळण म्हणून प्लास्टिक, रबर व टायरसारख्या वस्तूंचा वापर होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. यामुळे विषारी धूर निर्माण होऊन वायुप्रदूषण वाढत असल्याने प्रदूषण नियंत्रण यंत्रणांनी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.परिसरातील काही गुऱ्हाळांनी प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक बॉयलरचा वापर सुरू केला आहे. मात्र, त्यासाठी मोठ्या प्रमाणात वीज लागते. त्यामुळे वीजवापर नियमांनुसार होत आहे का, यावर महावितरणनेही लक्ष ठेवावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. गुऱ्हाळ व्यवसायासाठी अन्न व औषध प्रशासन, प्रदूषण नियंत्रण मंडळ, महावितरण, वाहतूक विभाग तसेच इतर शासकीय नियमांचे पालन आवश्यक आहे. शेतकऱ्यांना योग्य दर, ग्राहकांना शुद्ध गूळ आणि पर्यावरण संरक्षण यांचा समतोल राखणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे मत आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here