पुणे : जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात साधारणपणे तीन-चार दशकांपूर्वी वाघ, तरस, लांडगे यांसारखी श्वापदे डोंगरकपारीत वास्तव्यास होती. मुबलक जंगल आणि शिकारीयोग्य प्राण्यांची उपलब्धता यामुळे त्यांचा मानवी वस्तीत वावर नव्हता. मात्र, काळ बदलला आणि औद्योगिकीकरण, जमिनींचे वाढते भाव यामुळे मोठ्या प्रमाणावर जंगलतोड झाली. त्याचा परिणाम बिबट्यांवर झाला आहे. सुरुवातीला पाळीव जनावरांवर उदरनिर्वाह करणारे बिबटे, आता जनावरे बंदिस्त झाल्याने शेतात काम करणाऱ्या महिला, लहान मुले आणि एकट्यादुकट्या नागरिकांना लक्ष्य करत आहेत. बिबट्यांच्या हल्ल्यांचे प्रमाण वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गेल्या सोळा वर्षांत बिबट्यांच्या हल्ल्यात सुमारे तीन ते साडेतीन हजार पाळीव जनावरांचा मृत्यू झाला आहे. दुर्दैवाने आतापर्यंत २८ ते ३० नागरिकांना आपला जीव गमवावा लागला असून, नव्वद ते शंभरहून अधिक जण जखमी झाले आहेत.
येडगाव, पिंपळगाव जोगा, वडज, माणिकडोह आणि चिल्हेवाडी या पाच धरणांमुळे मोठे जंगलक्षेत्र पाण्याखाली गेले. उसाच्या शेतीमुळे निर्माण झालेला मानव-वन्यजीव संघर्ष गंभीर बनला असून, यावर तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. वनविभागाकडून पिंजरे लावून बिबट्यांना पकडण्यात येते, परंतु माणिकडोह येथील निवारा केंद्रातील जागेच्या मयदिमुळे त्यांना पुन्हा अधिवासात सोडले जाते, ज्यामुळे समस्या मूळ जागेवरच राहते. शेतकऱ्यांनी शेतावर जाताना हातात काठी घेऊन जावे, लहान मुलांना एकटे घराबाहेर पाठवू नये, ज्या विभागात बिबट्या आढळला त्या भागात पिंजरा लावावा, जनजागृतीसाठी फ्लेक्स लावावेत, लोकांनी एकट्यादुकट्याने फिरू नये, ऊस क्षेत्रातून येता-जाताना मोठमोठ्याने आवाज करणे, गाणी म्हणणे, तसेच काठीला घुंगरे बसवून त्यांचा आवाज करावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी शासन, वन्यजीव तज्ज्ञ आणि संशोधकांनी एकत्र येऊन ठोस धोरण आखण्याची गरज आहे.
















