पुणे : केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाकडून (एनसीडीसी) महाराष्ट्र शासनामार्फत आर्थिक अडचणीतील सहकारी साखर कारखान्यांना भांडवली गुंतवणूक आणि खेळत्या भांडवलासाठी अर्थसाह्य देण्याचे धोरण आहे. त्यानुसार राज्यातील ५ सहकारी साखर कारखान्यांच्या सुमारे १,२६३ कोटी १७ लाख रुपयांच्या कर्ज मंजुरीच्या त्रुटींचा पूर्तता अहवाल साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी सहकार विभागाच्या प्रधान सचिवांना पाठवला आहे.राज्य सरकारच्या पाठपुराव्यामुळे या कारखान्यांना लवकरच कर्ज मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या राजगड सहकारी साखर कारखान्याला (भोर, पुणे) ४४७.८५ कोटी रुपये मंजूर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
पृथ्वीराज जाचक यांच्या श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे (इंदापूर, पुणे) ३६१.४१ कोटी रुपयांचे कर्ज प्रलंबित आहे. माजी आमदार अशोक पवार यांच्या रावसाहेब पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्यासाठी (शिरूर, पुणे) १८४.९२ कोटी रुपये प्रस्तावित आहेत. राहुल जगताप यांच्या कर्मयोगी कुंडलिकराव जगताप पाटील कुकडी कारखान्यासाठी ४९.८५ कोटी रुपये मंजूर केले जाणार आहेत. तसेच धर्मराज काडादी यांच्या श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यासाठी (सोलापूर) १९९.१४ कोटी रुपयांच्या कर्ज मागणीचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.
पुणे साखर आयुक्तालयाचे साखर संचालक (अर्थ) यशवंत गिरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारमार्फत पाठवलेल्या कर्ज मंजुरी प्रकरणात ७ पैकी ५ कारखान्यांनी आयुक्तालयाकडे खुलासे सादर केले होते. हे पूर्तता अहवाल आता शासनाकडे पुढील निर्णयासाठी पाठवले असून, राज्य शासनाकडून कर्ज मंजुरीचे हे प्रकरण अंतिम मंजुरीसाठी थेट ‘एनसीडीसी’कडे पाठवले जाईल.


















