पुणे : माजी मंत्री तथा भूम-परंडा मतदारसंघाचे आमदार डॉ. तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर येथील नरसिंह भैरवनाथ शुगर कारखान्याचा मिल रोलर पूजन कार्यक्रम शनिवारी, दि. ९ रोजी उत्साहात पार पडला. कारखान्यातील मिल विभागात सकाळी १०.३० वाजता विधिवत पूजा करण्यात आली. भैरवनाथ उद्योग समूहाचे व्हाईस चेअरमन विक्रम सावंत यांच्या हस्ते रोलर पूजन करण्यात आले. आगामी गळीत हंगामात सुमारे ३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याची माहिती सावंत यांनी दिली.
इंदापूरचा नरसिंह सहकारी साखर कारखाना गेल्या अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत होता. भैरवनाथ शुगर वर्क्सने हा कारखाना खरेदी करून अल्पावधीत गाळपासाठी सज्ज केल्याची माहिती व्यवस्थापनाकडून देण्यात आली. सद्यस्थितीत कारखान्याचा मिल विभाग, बॉयलर विभाग, टर्बाईन विभाग, बॉयलिंग हाऊस तसेच उत्पादन विभागातील सेंट्रीफ्यूगल, पॅन आणि शुगर हाऊस विभागातील दुरुस्तीची कामे पूर्णत्वास आल्याचे सांगण्यात आले. कारखाना १५ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण क्षमतेने गळीत हंगामासाठी सज्ज होणार असल्याचे सांगण्यात आले. कार्यक्रमास श्रेया सावंत, सत्यवान गपाट, पांडुरंग पारडे, सुंदर पारडे, बालाजी नकाते, राहुल आडमुटे यांच्यासह शेतकरी, ठेकेदार, अधिकारी, कर्मचारी व कामगार उपस्थित होते.


















