पुणे : नीरा भीमा सहकारी साखर कारखाना आगामी २०२६-२७ साखर गळीत हंगामासाठी ७ लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कारखान्याची संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती कारखान्याच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील यांनी शनिवारी (दि. ८) दिली. शहाजीनगर (ता. इंदापूर) येथील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याच्या आगामी गळीत हंगामासाठी २०२६-२७ साठी बसवण्यात येणाऱ्या मिल रोलरचे पूजन राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते आणि कारखान्याच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
आगामी गाळीत हंगामात शेतकऱ्यांनी आपला सर्व ऊस कारखान्यास देऊन सहकार्य करावे, असे आवाहन कारखान्याच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील यांनी केले. नीरा भीमा कारखान्याचे संस्थापक हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या आगामी गळीत हंगामासाठी मशिनरीची कामे प्रगतीपथावर आहेत. कारखान्याने मागील २५ वर्षात शेतकऱ्यांना नेहमी चांगला दर दिला आहे. चालू वर्षी धरणांमध्ये पाणीसाठा झाल्याने शेतकऱ्यांनी उपलब्ध सर्व क्षेत्रावर ऊस लागवड करावी, असे आवाहन केले आहे.
नीरा भीमा कारखाना कार्यक्षेत्रातील नीरा नदीवरील कळंब ते नीरा नरसिंहपूर पर्यंतच्या 1३ बंधाऱ्यांची आणि भिमा नदीवरील भाटनिमगाव, टणू व शेवरे या ३ बंधाऱ्यांची जबाबदारी घेणार आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे २ पाटील यांच्याशी चर्चा झाली आहे, यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल, अशी माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
या कार्यक्रमावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष दादासाहेब घोगरे, लालासाहेब पवार, विलासराव वाघमोडे, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, राजकुमार जाधव, विजय घोगरे, सुभाष गायकवाड, राजेंद्र देवकर, उमेश पाटील, महेशकुमार शिर्के, आनंदराव बोंद्रे, रामचंद्र नाईक, राहुल कांबळे, संगिता पोळ, मोहन गुळवे, तानाजी नाईक, अजिनाथ पाटील, महादेव क्षीरसागर, गोविंद रणवरे, जयकुमार कारंडे, दयानंद गायकवाड, रामचंद्र पाटील, महादेव शेंडगे, रणजित वाघमोडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यकारी संचालक एन. ए. सपकाळ यांनी स्वागत केले.


















