पुणे: जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपूर्वी गारपीट झाली. शिरूर तालुक्यात मागील आठवड्यात गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यानंतर प्रशासनाने मदतीसाठी सर्व्हे सुरू केला आहे. मात्र, शेतातील कांदा तसेच गव्हाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून आले. अशा अनेक शेतकऱ्यांच्या सातबारावर ई-पीक पाहणीत उसाची नोंद असल्यामुळे आता पंचनामा कसा करायचा? या तांत्रिक अडचणीत प्रशासन पडले आहे. सातबारावरील पिकाची नोंद हेच पंचनाम्याचे मूळ असल्याने प्रत्यक्ष शेतात नुकसान होऊन ही ऑनलाइन माहिती भरताना प्रशासनापुढे अडचणी उभ्या राहत असल्याची माहिती पुढे येत आहे.
नैसर्गिक आपत्तीच्या काळात मदतीसाठी सरकारने आदेश दिल्यानंतर आता शेतांमध्ये जाऊन पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. मात्र अनेक ठिकाणी ई-पीक पाहणीमध्ये सातबाऱ्यावर ऊस व प्रत्यक्ष शेतात कांदा अशी परिस्थिती असल्याने आता काय करायचे? हा प्रश्न निर्माण झाला आहे. ऊस पिकाला जादा पीक कर्ज मिळते. त्यामुळे शेतकरी पीक कर्जासाठी आपल्या शेतात ऊस आहे, अशी नोंद सातबारावर करतात. ई-पीक पाहणी करताना त्या शेतात जाऊन पिकाची नोंद केल्यानंतर परत तो हंगाम संपेपर्यंत दुसऱ्या पिकाची नोंद करता येत नाही. यापूर्वी पिकांच्या नोंदी हा गावचा तलाठी करीत होता; मात्र आता ई-पीक पाहणी शेतकऱ्यांनी स्वतः करायची आहे. सोसायटीच्या कर्जासाठी शेतकरी सातबारावर उसाच्या नोंदी करतो आणि मोठ्या प्रमाणात पीक कर्ज उचलतो. त्यामुळे आता गारपिटग्रस्त शेतकऱ्यांना अशा अडचणींना सामोरे जावे लागत आहे.


















