पुणे : बिजवडी-महात्मा फुलेनगर येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी, दि १६ ऑक्टोबर रोजी ४१ अर्ज दाखल झाले. कारखाना निवडणुकीच्या पुढील प्रक्रियेनुसार, १९ ऑक्टोबरला अर्जाची छाननी, २१ ऑक्टोबरला वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे, ४ नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज मागे घेणे, तर ५ नोव्हेंबरला चिन्हवाटप आणि अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. १३ नोव्हेंबरला मतदान, तर १५ नोव्हेंबरला मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने यांनी दिली.
कारखाना निवडणुकीसाठी एकूण उमेदवारी अर्जाची संख्या ५१ वर पोहोचली आहे. या निवडणुकीत दि. १२ ऑक्टोबरला २, दि. १४ ऑक्टोबरला ३, दि. १५ ऑक्टोबरला ५ आणि दि. १६ ऑक्टोबरला ४१ अर्ज दाखल झाले. गटनिहाय आकडेवारीनुसार, कालठण गटातून सर्वाधिक १०, पळसदेव गटातून ८, इंदापूर गटातून ७, भिगवण गटातून ६ आणि शेळगाव गटातून ४ अर्ज दाखल झाले. महिला राखीव गटातूनही ४ अर्ज दाखल झाले आहेत. अनुसूचित जाती-जमाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय आणि ‘ब’ वर्ग संस्था या प्रत्येक प्रवर्गातून प्रत्येकी ३ अर्ज दाखल झाल्याची माहिती देण्यात आली.


















