पुणे : थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांचे ४३ कोटी १५ लाख ४६ हजार रुपये कारखान्याकडे थकीत आहेत. ही रक्कम १५ टक्के व्याजासह तातडीने अदा करावी, अशी मागणी यशवंत सहकारी साखर कामगार संघटनेने केली आहे. यशवंत सहकारी साखर कामगार संघटनेची नुकतीच अध्यक्ष तात्यासाहेब काळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यानंतर संघटनेने कारखान्याच्या कार्यकारी संचालकांना पत्र दिले आहे. याबाबत तातडीने कार्यवाही न झाल्यास कामगार तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबतील, असा इशारा संघटनेने दिला आहे.
याबाबत कामगार संघटनेने म्हटले आहे की, साखर कारखान्याच्या हजारो कामगारांचे जुलै २०११ ते ऑगस्ट २०१८ या ७ वर्षे आणि २ महिने महिन्यांच्या कालावधीतील थकीत वेतन आणि इतर कायदेशीर देणी प्रलंबित आहेत. पगार, ग्रॅच्युइटी आणि पीएफ मिळून एकूण ४३ कोटी १५ लाख ४६ हजार रुपये थकीत आहेत. त्यामुळे ही देणी व्याजासह मिळण्याची गरज आहे. यावेळी जनरल सेक्रेटरी पंडित धुमाळ, उपाध्यक्ष बाळकृष्ण हरपळे, गुलाब चौधरी, सहसचिव नाना कुंजीर, पांडुरंग भालसिंग, कोषाध्यक्ष वसंत शेवाळे यांच्यासह मोठ्या संख्येने सभासद कामगार उपस्थित होते.


















