नवी दिल्ली: भारतात जुलै 2026 महिन्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या (ईव्ही) किरकोळ विक्रीने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. या महिन्यात एकूण 3,27,901 इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी झाली असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत 66 टक्क्यांहून अधिक वाढ नोंदविण्यात आली आहे. ही माहिती फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन्स (फाडा) ने दिली.
फाडाच्या आकडेवारीनुसार, जुलै महिन्यात देशात विकल्या गेलेल्या प्रत्येक आठ वाहनांपैकी जवळपास एक वाहन इलेक्ट्रिक होते. पश्चिम आशियातील तणावामुळे कच्च्या तेलाच्या किंमती पुन्हा वाढू शकतात आणि महागाईला चालना मिळू शकते, त्यामुळे ग्राहकांचा कल अधिक प्रमाणात इलेक्ट्रिक वाहनांकडे वळू शकतो, असेही ‘फाडा’ने नमूद केले आहे.
‘फाडा’चे उपाध्यक्ष साई गिरीधर म्हणाले, “भारताने जुलै 2026 मध्ये एका महिन्यात आतापर्यंतची सर्वाधिक इलेक्ट्रिक वाहने खरेदी केली. एकूण 3,27,901 वाहनांची नोंदणी झाली असून, ती 66 टक्क्यांहून अधिक वार्षिक वाढ दर्शवते. आता देशातील प्रत्येक आठ वाहनांपैकी जवळपास एक वाहन इलेक्ट्रिक आहे.”
दुचाकी आणि तिनचाकी वाहनांत मोठी झेप
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांनी प्रथमच दोन लाख युनिट्सचा टप्पा ओलांडला. जुलै 2026 मध्ये या विभागाचा बाजारातील वाटा 11.2 टक्के होता. जून 2026 मध्ये तो 10.6 टक्के, तर जुलै 2025 मध्ये 7.7 टक्के होता. इलेक्ट्रिक तिनचाकी वाहनांचा बाजारातील वाटा 65.1 टक्क्यांपर्यंत वाढला असून, जून 2026 मध्ये तो 62.7 टक्के आणि जुलै 2025 मध्ये 60.3 टक्के होता. गिरीधर यांच्या मते, दुचाकी विभागाने पहिल्यांदाच दोन लाखांचा टप्पा पार केला, तर तिनचाकी विभागात इलेक्ट्रिक वाहन आता पर्याय नसून मुख्य प्रवाहातील निवड बनले आहे.
व्यावसायिक वाहनांमध्येही वाढ
व्यावसायिक वाहन (कमर्शियल व्हेईकल) विभागात इलेक्ट्रिक वाहनांचा बाजारातील वाटा 3.57 टक्क्यांपर्यंत वाढला. जून 2026 मध्ये तो 3.54 टक्के, तर जुलै 2025 मध्ये 1.65 टक्के होता.फाडाच्या मते, व्यावसायिक वाहनांच्या ताफ्यांचे विद्युतीकरण आता प्रायोगिक टप्प्यातून प्रत्यक्ष खरेदीच्या टप्प्यात पोहोचले आहे.
प्रवासी इलेक्ट्रिक वाहनांत 83 टक्के वाढ
प्रवासी इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत (पॅसेंजर ईव्ही) मागील वर्षाच्या तुलनेत 83 टक्के वाढ झाली. जुलै 2026 मध्ये या विभागाचा बाजारातील वाटा 7.9 टक्के होता, जो जून 2026 इतकाच आहे; मात्र जुलै 2025 मधील 5.1 टक्क्यांच्या तुलनेत लक्षणीय अधिक आहे.

















