नवी दिल्ली : एप्रिल २०२६ मध्ये भारतातील किरकोळ महागाई दरात वाढ नोंदवण्यात आली असून ती मार्चमधील ३.४० टक्क्यांवरून वाढून ३.४८ टक्क्यांवर पोहोचली. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने मंगळवारी जाहीर केलेल्या ग्राहक किंमत निर्देशांकाच्या (CPI) तात्पुरत्या आकडेवारीत ही माहिती समोर आली. अन्नपदार्थांच्या वाढत्या किमतींमुळे महागाईत वाढ झाली असली तरी बटाटा आणि कांदा यासारख्या प्रमुख भाज्यांच्या दरात घट झाली आहे.एप्रिल महिन्यात ग्रामीण भागातील महागाई दर ३.७४ टक्के राहिला, जो मार्चमध्ये ३.६३ टक्के होता. शहरी भागातील महागाई दर ३.११ टक्क्यांवरून वाढून ३.१६ टक्के झाला. राष्ट्रीय स्तरावर एकत्रित ग्राहक किंमत निर्देशांक एप्रिलमध्ये १०५.१२ इतका नोंदवण्यात आला, जो मार्चमध्ये १०४.८४ होता.
ग्राहक अन्न किंमत निर्देशांकानुसार (CFPI) अन्नमहागाई दर मार्चमधील ३.८७ टक्क्यांवरून एप्रिलमध्ये ४.२० टक्क्यांपर्यंत वाढला. ग्रामीण भागात हा दर ४.२६ टक्के, तर शहरी भागात ४.१० टक्के राहिला. एप्रिलमध्ये CFPI निर्देशांक १०४.३९ इतका नोंदवण्यात आला.टोमॅटो, दागिने आणि नारळाच्या कोप्र्याच्या वाढलेल्या किमतींमुळे अन्नमहागाईत वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. एप्रिलमध्ये टोमॅटो महागाई दर ३५.२८ टक्के राहिला. चांदीच्या दागिन्यांच्या किमतींमध्ये सर्वाधिक १४४.३४ टक्क्यांची वाढ झाली. त्यानंतर नारळ कोप्रा ४४.५५ टक्के आणि सोने, हिरे व प्लॅटिनम दागिन्यांच्या किमतींमध्ये ४०.७२ टक्क्यांची वाढ झाली. फुलकोबीच्या किमतींमध्येही २५.५८ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली.
दुसरीकडे, भाज्यांच्या किमतींमध्ये मोठी घसरण झाली. बटाट्याचा महागाई दर मार्चमधील उणे १९.०३ टक्क्यांवरून एप्रिलमध्ये उणे २३.६९ टक्क्यांपर्यंत घसरला. कांद्याचा महागाई दरही उणे २७.७८ टक्क्यांवरून उणे १७.६७ टक्क्यांवर आला. मोटार कार आणि जीपच्या किमतींमध्ये उणे ७.१२ टक्के, वाटाणा आणि हरभऱ्यामध्ये उणे ६.७५ टक्के, तर एअर कंडिशनरच्या किमतींमध्ये उणे ५.०६ टक्क्यांची घट झाली.एप्रिल २०२६ मध्ये घरभाडे महागाई दर राष्ट्रीय स्तरावर २.१५ टक्के राहिला. ग्रामीण भागात तो २.६५ टक्के, तर शहरी भागात १.९६ टक्के नोंदवण्यात आला.राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या फील्ड ऑपरेशन्स विभागाने देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील १,४०७ शहरी बाजारपेठा आणि १,४६५ गावांमधून दरांची माहिती संकलित केली. एप्रिल महिन्यात ग्रामीण आणि शहरी भागात १०० टक्के प्रतिसाद नोंदवण्यात आला.


















