सांगली : पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्याने यंदा २० लाख ऊस रोपे निर्मितीचे उद्दिष्ट ठेवले आहे. गळीत हंगाम २०२६-२७ मध्ये मूलभूत बियाणापासून प्लास्टिक ट्रेमधील दर्जेदार ऊस रोपे तयार करून कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना पुरवठा केला जाणार आहे अशी माहिती कारखान्याचे उपाध्यक्ष रामचंद्र भाडळकर, केदार नायकवडी यांनी दिली. आगामी गळीत हंगामात शेवटच्या दिवसापर्यंत पूर्ण क्षमतेने ऊस पुरवठा होण्यासाठी तोडणी-वाहतूक करार आणि ऊस नोंदणीची कामे गतीने सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
उपाध्यक्ष रामचंद्र भाडळकर यांनी शेतकऱ्यांनी कारखान्याच्या ऊस विकास योजनांचा व मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे सांगितले. कारखान्याच्या ऊस विकास विभागाच्या नर्सरीमध्ये ऊस रोपे निर्मितीचा प्रारंभ कारखान्याचे उपाध्यक्ष रामचंद्र भाडळकर, केदार नायकवडी आणि संचालकांच्या उपस्थितीत झाला. यावेळी केदार नायकवडी यांनी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून एकरी उत्पादन वाढवावे आणि उत्पादित संपूर्ण ऊस कारखान्याकडे गळितासाठी द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. संचालक गंगाराम सूर्यवंशी, लक्ष्मण शिंदे, तुकाराम डवंग, बापूसो पाटील, विश्वास थोरात, संभाजी पाटील, तानाजी निकम, शिवाजी जावीर, नंदू पाटील, अरुण यादव, पोपट अहिर, सेक्रेटरी मुकेश पवार, एन. डी. पाटील, ओंकार खोत, नितीन नायकवडी, संजय गायकवाड, मदन पाटील, नीलेश सव्वाशे आदी उपस्थित होते.


















